पंतप्रधानांच्या हस्ते आज बाबासाहेबांच्या स्मारकाचं भूमीपूजन

October 11, 2015 12:42 PM0 commentsViews:

sdfasdsadas

11 ऑक्टोबर : इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं भूमीपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी साडेचार वाजता चैत्यभूमीवर या स्मारकाचं भूमीपूजन होणार आहे. त्यांनंतर वांदे-कुर्ला संकुलात मोदींच्या उपस्थितीत एक सभाही पार पडणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या स्मारकासाठी आंबेडकरी अनुयायांनी प्रदीर्घ काळ लढा दिला. इंदू मिलची जमीन हस्तांतरीत करण्याची प्रक्रीया युपीए सरकारच्या कार्यकाळात सुरू झाली होती मात्र ती एनडीए सरकारने पूर्ण केलीय. त्यामुळे आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस ठरणार आहे.

कसं असणार स्मारक ?

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 150 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा
  • 140 x 110 फुटांचा भव्य स्तुप
  • अशोक चक्र
  • 13,000 क्षमतेचा विपश्यना हॉल
  • 50,000 चौ.फूट भव्य ग्रंथालय
  • सभागृह, चर्चासत्र आणि परिषद गृह, भोजनालय, फूड कोर्ट
  • वस्तुसंग्रहालय, गॅलरी, बुद्ध पार्क
  • भविष्यातील देशाची वाटचाल दर्शवणारं विशेष दालन

दरम्यान, इंदू मिल आणि मेट्रो प्रकल्पाच्या भूमीपूजनावरुन शिवेसना आणि भाजपमध्ये मानापमान नाट्य सुरूच आहे. बाबासाहेबांविषयी ज्यांना-ज्यांना प्रेम असेल त्यांनी या कार्यक्रमाला यावं, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्षांनी शिवसेनेला लगावलाय. त्यावर सेनेनेही उत्तर दिलंय. आम्हाला बाबासाहेबांच्या प्रेमाबद्दल कुणी शिकवू नये. रविवारच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आदल्या दिवशी देणं चुकीचं आहे, उद्धव ठाकरे हे लहान नेते नाहीत, अशा शब्दात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.

तर मित्रपक्षांसोबत विरोधकांनीही भाजपवर टीका केली. ज्यांनी या स्मारकासाठी ज्यांनी मंजूरी मिळवली होती, भाजपला त्यांचा विसर पडलाय का?, असा सवाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून विचारण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात या स्मारकासाठीची परवानगी मिळाली होती. मात्र भाजप सरकारनं त्यांनाही आमंत्रण दिलेलं नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनीही भाजप सरकारवर टीका केली आहे. या भूमीपूजनाला सरकारनं सर्वपक्षीयांना निमंत्रण द्यायला हवं असं त्यांना म्हटलं आहे. हा सर्वतोपरी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. हा कार्यक्रम सरकारी न ठेवता खासगी केलाय अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close