कसुरींच्या पुस्तक प्रकाशनाचा वाद : सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाईफेक

October 12, 2015 10:09 AM0 commentsViews:

12 ऑक्टोबर : पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या कार्यक्रमाचा वाद चिघळला आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचे आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर आज सकाळी ऑईलपेंट हल्ला झाला आहे. कुलकर्णी गाडीतून जात असताना अज्ञात व्यक्ती त्यांच्या गाडीजवळ आले आणि त्यांना गाडीतून उतरण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांनी कुलकर्णी यांना शिविगाळ करत ऑईलपेंट लावला. शिवसेना कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचं आरोप कुलकर्णी यांनी केला आहे.

प्रसिद्ध पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली यांच्या मुंबई आणि पुण्यातील कार्यक्रमांना विरोध केल्यानंतर शिवसेनेने पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांचा मुंबईत होणारा पुस्तक प्रकाशन समारंभही उधळून टाकण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे खुर्शीद कसुरी मुंबईत दाखल झाले असून कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होणारच, असा निर्धार आयोजकांनी केला आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कार्यक्रमाला सुरक्षा पुरवण्याचं आश्‍वासनही दिलं आहे. त्यामुळे सत्तेत भागीदार असलेले भाजप आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा वाद चिघळण्याची शक्यता आहेत.

49317723

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद मेहमूद यांच्या ‘नायदर अ हॉक नॉर अ डोव – ऍन इनसायडर्स अकाऊंट ऑफ पाकीस्तान्झ फॉरेन पॉलीसी’ या पुस्तकाचं आज (सोमवारी) सायंकाळी मुंबईत प्रकाशन होणार आहे. शिवसेनेने या कार्यक्रमाला तीव्र विरोध केला असून कार्यक्रम उधळण्याचा इशारा दिला आहे. या पाश्‍र्वभूमीवर समारंभासाठी अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.

या कार्यक्रमाचे आयोजक सुधीर कुलकर्णी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे, पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. उलट त्यांच्यावर शाईहल्ला झालाय. शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचा आरोप सुधींद्र कुलकर्णी यांनी केलाय. भारत-पाकिस्तान सीमेवर वारंवार होणारे युद्धबंदीचे उल्लंघन, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या कारवायांच्या निषेधार्थ हा कार्यक्रम शांततेत पार पडू देणार नाही असं सेना विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाला पूर्ण सुरक्षा पुरवण्याचं आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयबीएन नेटवर्कशी बोलताना दिलं आहे. भारतात येणार्‍या विदेशी मुत्सद्यांना संरक्षण देणं हे सरकारचं कर्तव्य आहे, पण याचा अर्थ आम्ही त्यांच्या मतांशी सहमत आहोत असं नाही, असंही ते म्हणाले आहेत. तसंच कार्यक्रमादरम्यान भारत विरोधी प्रचार खपवून घेणार नाही, आणि जर असं आढळल्यास यासाठी आयोजकांना जबाबदार धरणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close