लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी शासनाचे सर्व पुरस्कार केले परत

October 13, 2015 5:52 PM0 commentsViews:

pradnya daya pawar13 ऑक्टोबर : देशात वाढत्या असहिष्णुतेचा निषेध म्हणून साहित्यिकांनी एल्गार पुकारलाय. देशभरातील साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतलाय. यात आता आणखी एक मराठी नाव जमा झालंय. लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी शासनाचे सर्व पुरस्कार परत केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर होणारे हल्ले आणि विचारवंतांच्या होणार्‍या हत्या, याविरोधात प्रज्ञा पवारांनी निषेध व्यक्त केलाय.

दादरी हत्याकांड, डॉ.कलबुर्गी हत्या प्रकरण,लव्ह जिहाद या प्रकरणाचा निषेध करत देशभरातील साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतलाय. आज लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपल्याला मिळाले पुरस्कार परत केले आहे. त्यांनी या पत्राची पत्र फेसबुकवर पोस्ट केलीये.

एका अघोषित अशा आणीबाणीच्या पर्वातून आपण सगळेच सध्या जात आहोत. 1975 मधील आणीबाणीपेक्षाही सद्यकालीन आणीबाणीची भीषणता अधिक तीव्र आहे असं परखड मत नोंदवलंय. तसंच  भारतीय राज्यघटनेच्या पायाभूत मूल्यांवरच घाव घालण्याचा हा जो चौफेर प्रयत्न सुरू आहे त्याचा निषेध म्हणून मी मला मिळालेले आजवरचे सर्व शासकीय पुरस्कार, पुरस्कारांच्या रक्कमेसह 1,13,000 रुपये शासनाला परत करीत आहे असं पवार यांनी जाहीर केलं.

दरम्यान, आज आणखी दोन साहित्यिकांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. काश्मिरी लेखक गुलाम नबी खयाल आणि मध्य प्रदेशातले प्रसिद्ध कवी राजेश जोशी यांनी आपापले पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याशिवाय कलाकार माया कृष्णा राव यांनीही दादरी प्रकरणाची निषेध म्हणून संगीत नाटक अकादमी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 12 जणांनी अकादमी पुरस्कार परत केले आहेत.

आताच पुरस्कार का परत ?-सदानंद मोरे

तर दुसरीकडे आता पुरस्कार परत करणार्‍यांनी डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांची हत्या झाली तेव्हा पुरस्कार का परत केले नाहीत, असा सवाल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केलाय. हे सगळे कलबुर्गी यांच्या हत्येपर्यंत का थांबले असा सवालही त्यांनी केलाय. साहित्य अकादमी पुरस्कार परत करणं मला योग्य वाटत नाही,असंही ते म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close