मुंबई महापालिकेत सेनेसोबत युती होणार -मुख्यमंत्री

October 15, 2015 8:58 PM0 commentsViews:

uddhav and fadanvis_new15 ऑक्टोबर : शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडदा टाकलाय. येणार्‍या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार अशी घोषणाच मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत केलीये. तसंच बिहार निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

गुलाम अली प्रकरण, सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर पेंट हल्ला प्रकरणावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद विकोपाला गेले होते. शिवसेनेनं तर भाजपला सत्तेतून बाहेर पडावं असं आव्हानच हगे दिलं होतं. पण, भाजपने ‘थंडा कर के खावो’ अशी रणनीती अवलंबून वादावर पडदा टाकला.

मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मिळवून लढवण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. त्यानुसार मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेसोबत युती होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाहीर केलं.

तसंच बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. या विस्तारात घटकपक्षांचा समावेश केला जाईलही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

शिवसेना आणि भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. कुणी भूमिका मांडत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. पण, कोणत्याही पक्षाची भूमिका ही पक्षप्रमुख मांडत असतो, संपादकीय नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता टोला लगावला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close