फिल्म रिव्ह्यु : ‘राजवाडे अँड सन्स’

October 17, 2015 7:08 PM0 commentsViews:

 

अमोल परचुरे, समीक्षक

दोन महिन्यांपूर्वी ‘डबल सीट’ सिनेमा आला होता. मध्यमवर्गीयांच्या मनात असलेल्या आशा आकांक्षा त्यामध्ये मांडल्या होत्या. आता दोन महिन्यांनंतर आलाय ‘राजवाडे अँड सन्स’… तसा दोन्ही सिनेमांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, पण दोन्ही सिनेमे एका कुटुंबाची गोष्ट सांगतात. एकत्र कुटुंबाची ओढ असणं बरोबर आहे, पण म्हणून आपल्या माणसांना बांधून ठेवणं हेही बरोबर नाही. ‘डबल सीट’मध्ये साधारण तसाच आशय होता. अशीच आधुनिक समज आपल्या आधुनिक समाजात यावी हाच विचार प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी सचिन कुंडलकरने ‘राजवाडे अँड सन्स’ आणला आहे.

एकत्र कुटुंबपद्धतीवर आजवर अनेक सिनेमे आले, पण हा बदलत्या एकत्र कुटुंबाचा सिनेमा आहे. शहर बदलतंय, सुखाच्या कल्पना बदलतायत, नाती बदलत चालली आहेत, आणि आसपास हा असा भरमसाठ बदल होत असताना एका बिझनेस फॅमिलीमध्ये त्याचे काय काय पडसाद उमटतात याचं अगदी खरंखुरं असं चित्र सचिन कुंडलकरने या सिनेमात उभं केलंय. ‘राजवाडे अँड सन्स’चं वैशिष्ट्य म्हणजे यात कुणी नायक नाही, कुणी खलनायक नाही… एरवी अशा फॅमिली सागामध्ये उगाच हेवेदावे, वादावादी, संशय घेणं असे अनेक टिपिकल प्रकार असतात, त्यांना फाटा देऊन सचिन कुंडलकर अँड टीमने एक सुरेख सिनेमा सादर केलाय.

काय आहे स्टोरी ?

rajwade-and-sonsकुटुंबप्रमुख रमेश राजवाडे यांनी आपल्या कडक शिस्तीने संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवलंय. हे कुटुंब ज्या वडिलोपार्जित वाड्यात राहत होतं, तो वाडा पाडून त्याजागी एक भव्य टॉवर उभा राहणार आहे. रमेश राजवाडे यांनीच ही सगळी योजना केलेली आहे. नवा टॉवर उभा राहीपर्यंत बिल्डरने दुसर्‍या एका अपार्टमेंटमध्ये दिलेल्या चार मोठ्या फ्लॅटमध्ये ही मंडळी राहतायत.

सिनेमा इथून सुरू होतो. वाड्यात एकत्र राहणारं हे राजवाडे कुटुंब चार वेगळ्या फ्लॅटमध्ये राहायला आल्यावर कायकाय धमाल येते, कायकाय नवीन घडतं, त्यातून काय बिघडतं, कोणती नवी रहस्यं उलगडतात आणि सगळ्यातून हीच राजवाडे फॅमिली कशी आणखी जवळ येते असा प्रत्येक पिढीला आवडेल असा प्रवास या सिनेमात आहे. मोठ्या पिढीची शिस्त, मधल्या पिढीचा आज्ञाधरकपणा आणि तरुण पिढीची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची तगमग अशा तीन पातळ्यांवरची ही गोष्ट आहे. यात मेलोड्रामा नाही, जे जसं घडतं अगदी तसंच पडद्यावर दिसतं आणि म्हणूनच ही मांडणी आपल्याला आवडून जाते.

नवीन काय ?

राजवाडे अँड सन्स मध्ये सर्वात भावणारी गोष्ट म्हणजे कुटुंबात एकमेकांशी असलेली केमिस्ट्री…भावंडं असतील किंवा मामा भाचरं असतील, नात्यांचा हा जिव्हाळा खरंच आवडून जाईल असाच आहे. जेवढी चांगली गोष्ट, जेवढं चांगलं दिग्दर्शन, तांत्रिक बाजूसुध्दा तितकीच छान जमलेली आहे. कागदावर उमटलेली भव्यता कॅमेराबद्ध करताना कुठेही भपका वाटणार नाही याची काळजी घेतलेली जाणवते.

Rajwade-and-Sons-Marathi-Movieपरफॉर्मन्स

अभिनयाची बाजू तर भक्कम आहेच. मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर आणि अतुल कुलकर्णी हे पहिल्यांदाच एकत्र आलेत, त्यामुळे मधल्या पिढीची बाजू भक्कम झालीये. सचिनच्या बहुतेक सर्व सिनेमात दिसणार्‍या ज्योती सुभाष याही सिनेमात आहेत. सिनीअर पिढीची तगमग आणि व्याकुळता दाखवताना आपण अभिनयात का सिनिअर आहोत ते त्यांनी दाखवून दिलंय. सतीश आळेकर मोठ्या भूमिकेत मस्त भारदस्त वाटतात, कुटुंबावर पकड ठेवणार्‍या कुटुंबप्रमुखाची भूमिका त्यांनी उत्तमच वठवली आहे. ज्युनिअर्समध्ये सिद्धार्थ मेनन, आलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले यांनी मस्त भाव खाल्लेला आहे आणि अभिनयही चांगला केलाय.

रेटिंग 100 पैकी 80

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close