पवारांना मोदी सरकारचे धोरणं मान्य आहेत का?- पृथ्वीराज चव्हाण

October 18, 2015 2:57 PM0 commentsViews:

18 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपच्या वाढत्या जवळीकीवरुन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्ये राजकीय मैत्री असण्यावर आमचा आक्षेप नाही, पण देशात सध्या जे सुरू आहे ते राष्ट्रवादीला मान्य आहे का असा खोचक सवाल त्यांनी राष्ट्रवादीला विचारला आहे. आयबीएन लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते.

Prithvi112

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पवारांच्या निवासस्थानी केलेला मुक्काम आणि पवारांवर उधळलेली स्तुतीसुमने यामुळे भाजप आणि राष्ट्रवदीच्या जवळीकीविषयी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी आयबीएन लोकमतच्या कार्यक्रमात भाष्य केलं. मोदी आणि पवारांनी वैयक्तिक संबंध जरुर ठेवावेत, पण मोदी सरकारची धोरणं, निती शरद पवारांना मान्य आहे का असा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला. दुष्काळ जाहीर करुन काय उपयोग, शेतकर्‍यांना एक रुपयाची मदत दिली, पण संपूर्ण जनतेवर टॅक्स लावला अशी टीकाही त्यांनी केली.

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही असे सांगत चव्हाण म्हणाले, शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना मंत्रिपद पदरात पाडून घेण्यासाठी आक्रस्ताळेपणा दाखवत आहे. युती सरकारने शेतकर्‍यांचे एक रुपयाचे जरी कर्ज फेडले तर राजकारण सोडून देईल असं थेट आव्हानच त्यांनी सत्ताधार्‍यांना दिले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close