पाकविरोधात सेनेची ‘हॅटट्रिक’, बीसीसीआय-पीसीबी बैठक दिल्लीला हलवली

October 19, 2015 4:10 PM0 commentsViews:

sena vs bcci19 ऑक्टोबर : गुलाम अली, सुधींद्र कुलकर्णी आणि आता पाकिस्तान विरुद्ध सामन्यांना विरोधी आंदोलन करत शिवसेनेनं ‘हॅटट्रिक’ साधलीये. शिवसैनिकांनी आज (सोमवारी) बीसीसीआय आणि पाक क्रिकेट बोर्डाची बैठक उधळवून लावली आहे. आता ही बैठक दिल्लीला हलवण्यात आलीये. उद्या दिल्लीत ही बैठक होणार असून पाक बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान दिल्लीला रवाना झाले आहे. आज झालेल्या या राड्या प्रकरणी 10 शिवसैनिकांना अटक करण्यात आलीये.

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी पुन्हा एकदा क्रिकेट सामने भरवण्यासाठी हालचाल सुरू आहे. येत्या डिसेंबरमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामने खेळवले जाणार आहे. यासाठी आज मुंबईत बीसीसीआयचे अध्यक्ष शंशाक मनोहर आणि पाक बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक होणार होती. या बैठकीची कुणकुण सेनेला लागली.

बीसीसीआयच्या मुंबईतल्या मुख्यालयात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घुसून बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कुणालाही या आंदोलनाची कल्पना नव्हती. बीसीसीआयच्या मुख्यालयात नेहमीच सुरक्षा व्यवस्था असते. पण, त्या कुणालाही न जुमानत जवळपास 50-60 शिवसेना कार्यकर्ते शशांक मनोहर यांच्या केबिनमध्ये घुसले आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांसोबत चर्चा करू नका, अशा घोषणा दिल्या.

त्यानतंर दहा मिनिटांतच पोलीस कुमक पोहोचली आणि त्यांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आंदोलक शिवसैनिकांची पाठ थोपटली. या आंदोलनाचा शिवसेनेला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

भाजपने मात्र या आंदोलनावर बोटचेपी भूमिका घेतली. लोकशाहीत सर्वांनाच आंदोलनाचा अधिकार आहे आणि भारत-पाक क्रिकेट सामने झाले नाही तर आभाळ कोसळणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी आयबीएन लोकमतला फोनवरून दिलीय.

गुलाम अली, सुधींद्र कुलकर्णी आणि आज शशांक मनोहर

गेल्या पंधरा दिवसात शिवसेनेने तिसर्‍यांदा अशा प्रकारचं आंदोलन केलंय. यापूर्वी पाकिस्तानचे प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांच्या मुंबई आणि पुण्यातल्या कार्यक्रमाला विरोध केला. त्यामुळे दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तकाचं मुंबईत प्रकाश होतं. त्यालाही शिवसेनेने विरोध केला आणि हा प्रकाशन सोहळा आयोजित करणारे सुधींद्र कुलकर्णी यांच्या चेहर्‍याला काळा पेंट फासला. त्याचाही देशभरातून निषेध झाला. तरीही पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला आणि आज शिवसेनेने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने नको, अशी भूमिका घेत बीसीसीआय अध्यक्षांना काळे झेंडे दाखवले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close