कॉम्रेड पानसरेंवर दोन बंदुकांतून गोळीबार

October 22, 2015 12:59 PM0 commentsViews:

pansare new

22 ऑक्टोबर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर दोघा हल्लेखोरांनी दोन बंदुकांतून अगदी जवळून गोळ्या झाडल्याचं बॅलेस्टिक रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे. बाईकवरून आलेल्या दोघांनीच पानसरेंवर गोळीबार केल्याच्या संशयाला आता पुष्टी मिळाली आहे.

16 फेब्रुवारी 2015 ला सकाळी सव्वानऊच्या सुमारास हा हल्ला झाला होता. पोलिसांना घटनास्थळी पाच पुंगळ्या सापडल्या होत्या. चार पुंगळ्या जमिनीवर तर एक पुंगळी सागर शिक्षण संस्थेच्या भिंतीला लागली होती. हल्लेखोरांनी पाच राउंड फायर केलं होतं. पानसरे यांच्या मानेत आणि छातीत गोळी घुसली होती तर एक गोळी कमरेजवळून घासून गेली होती. पानसरे यांच्या पत्नी उमा यांच्या डोक्यालाही एक गोळी चाटून गेली होती.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे संशयित असल्याचं आढळून आलं आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या पुंगळ्या पुणे, मुंबई आणि गुजरातच्या फॉरेन्सिक लॅबला तपासासाठी पाठवल्या होत्या. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात पाचही पुंगळ्यात थोडा फरक जाणवला आहे. त्यामुळे पानसरे यांच्यावर दोन बंदुकांतून गोळ्या झाडल्याचे स्पष्ट झालं आहे. दोन्ही बंदुका गावठी बनावटीच्या होत्या. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळ सीमेवर गावठी बंदुकांची विक्री होत असते. त्यामुळे हल्लेखोरांनी गावठी बंदुकीचा वापर केला होता हे स्पष्ट झालं आहे.

पानसरे हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडची न्यायालयीन कोठडी 23 ऑक्टोबरला (शुक्रवार) संपणार आहे. या पार्श्वभुमिवर बॅलेस्टिक रिपोर्टमध्ये हल्लेखोर दोन असल्याने गुन्ह्यातील दोन बंदुका जप्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. हल्लेखोर दोन असल्याने त्यांना शोधण्यासाठी एसआयटीने युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close