मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या आदेशात चुका आणि लबाड्या

October 23, 2015 6:15 PM0 commentsViews:

jayakwadi dam_news23 ऑक्टोबर : तहानलेल्या मराठवाड्याला 12.84 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झालाय. पण हा आदेशंच दिशाभूल करणारा आहे, असं सत्य आता पुढे येतंय. गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या या धक्कादायक आदेशात अनेक चुका आहेत. फक्त चुकाच नाहीत, तर लबाडी आणि फसवणूक सुद्धा आहे. या अहवालात खोटी आकडेवारी दाखवून धरणसाठ्यात वाढ दाखवण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर चक्क धरणाचं लोकेशन बदलण्याची गंभीर चुकही पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांनी केली आहे. विशेष म्हणजे हाच अहवाल हायकोर्टातही सादर करण्यात आलाय, म्हणजेच कोर्टाची दिशाभूल करण्याचे प्रतापही या अधिकार्‍यांनी केलेत.

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर आणि दारणा या 2 धरणसमुहातून 12.84 टीएमसी पैकी 4.60 टीएमसी पाणी जायकवाडीला सोडलं जाणार आहे. गंगापूर धरणसमुहात गंगापूर,गौतमी,काश्यपी आणि आळंदी हे धरण येतात आणि दारणा धरणसमुहात कडवा,भाम,भावली,वाकी,दारणा,मुकणे आणि वालदेवी हे धरण येतात. या अंतिम आदेशात मात्र गंगापूर धरणसमुहात असलेल्या आळंदी धरणाचं लोकेशन बदलून चक्क दारणा समुहात टाकण्याची घोडचूक पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांनी केली आहे. ही चूक केल्यानं उपलब्ध पाणीसाठा आणि यावर आधारीत पाणीसाठा याची आकडेवारीच बदलली आणि या गंभीर चुकीमुळं नाशिक जिल्ह्यातून चक्क 2 टीएमसी पाणी हे अतिरीक्त सोडलं जातंय.

या चुका फक्त लोकेशन बदलण्यापुरत्याच नाही तर आळंदी धरणातून, गंगापूर धरणात पाणी सोडण्यासाठी अद्यापपर्यंत कोणतीही प्रणाली विकसित नसल्याची माहितीही लपविण्यात आली आहे. आळंदी मधील पाणी हे फक्त सिंचनासाठी लिफ्ट करता येतं आणि कोणताही कॅनॉल नसल्यानं हे पाणी गंगापूर धरणात सोडता येत नाही.

अशा प्रकारची बनवेगिरी अधिकार्‍यांनी केल्यानं नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अत्यावश्यक असलेलं पाणी आता निदान 2 टीएमसी तरी पळवलं जाणार आहे. विशेष म्हणजे, हा दिशाभूल करणारा अहवाल हाटकोर्टातही सादर झालाय. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अर्थात MWRRA यांच्या अहवालात समान न्याय हक्क पाणी वाटप करण्यासाठी नोदवलेल्या निकषांना पार धाब्यावर बसवल्याचा अजब प्रकारही केल्याचं स्पष्ट होतंय.

या आदेशात कशा चुका आणि लबाड्या आहेत ?

1. आळंदी धरणाचं लोकेशनच बदललं
- आळंदी धरण हे गंगापूर धरणसमुहात आहे. पण या आदेशात ते दारणा धरणसमुहात दाखवण्यात आलं आहे
- त्यामुळे दारणा धरणसमुहाचा पाणीसाठी कागदावर वाढला, आणि यामुळे आता 2 टीएमसी पाणी जास्त सोडलं जाईल

2. आळंदी धरणातून गंगापूर परिसराला पाणी सोडण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. आळंदी धरणाचं पाणी फक्त सिंचनासाठी राखीव आहे. पण या खर्‍या बाबी कोर्ट आणि जनतेपासून लपवून दिला आदेश

3. ज्या धरणांमधून पाणी सोडायचं आहे, त्यांची पाहणी करा, उपयुक्त साठा निश्चित करा, आणि मग निर्णय घ्या, असं आदेश MWRRA नं दिले होते. पण पाटबांधारे खात्याच्या अधिकार्‍यांनी कोणतीही पाहणी केली नाही. पाहणी न करताच पाणी सोडण्याचे आदेश दिले.

4. MWRRA च्या अहवालानुसार या सर्व पाण्यावर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांचा हक्क आहे. या बाबीचं थेट उल्लंघन करत, अहवालाला केराची टोपली दाखवत हा आदेश देण्यात आला, आणि कोर्टाचीही दिशाभूल करण्यात आली.

5. सरकारनं 14, 708 गावात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली. यातली 1277 गावं नाशिक जिल्ह्यात आहेत. याचा विचार पाटबंधारे खात्यानं केला का?
 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close