कुठे आहे रामराज्य ?, ज्यांना रामराज्य दिसतंय त्यांना भेटायचंय – गुलजार

October 24, 2015 2:11 PM0 commentsViews:

gulzar_on_modi_sarakar24 ऑक्टोबर :  देशात सध्या पसरलेल्या असहिष्णुतेच्या वातावरणावरून ज्येष्ठ लेखक, कवी आणि गीतकार गुलजार हेही उद्विग्न झाले आहेत. ज्यांना रामराज्य दिसतंय, त्यांना मला भेटायला आवडेल. माणसाचं नाव विचारायच्या आधी त्याचा धर्म विचारायची परिस्थिती याआधी देशात नव्हती, अशी तीव्र भावना गुलजार यांनी व्यक्त केली.

दादरी प्रकरण, डॉ.कलबुर्गी हत्या प्रकरणाचा निषेध करत साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केले आहे. शुक्रवारी दिल्लीत लेखकांनी मुकमोर्चा काढला होता. आपल्या लेखणीने लाखो गाण्यांना साज चढवणारे ज्येष्ठ लेखक,गीतकार गुलजार यांनी असहिष्णुतेच्या वातावरणावर उद्विग्नता व्यक्त केली. त्यांनी आपली भावना बोलूनही दाखवली. एएनआयच्या प्रतिनिधींनी गुलजार यांना मोदी सरकार सत्तेवर विराजमान झालंय. पण कुठे आहे रामराज्य ? असा सवाल विचारला. त्यावर ते म्हणाले, ज्यांना कुणाला रामराज्य दिसत असेल तर त्यांना मला भेटायला आवडेल. कोण-कोण लोकं आहे ज्यांना रामराज्य दिसतंय तेही पाहण्यास आवडेल अशी प्रतिक्रिया गुलजार यांनी दिली. तसंच असहिष्णुतेच्या वातावरणामुळे अस्वस्थ आणि चिंता वाटत आहे. समजत नाही की आपण कुठे चाललोय. असं वातावरण या आधी पाहिलं नव्हतं. पूर्वी सर्वांना बोलण्याचं स्वातंत्र्य होतं आता तर माणसाचं नाव विचारायच्या आधी त्याचा धर्म विचारायची परिस्थिती निर्माण झालीये अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

लेखक आपले पुरस्कार परत करून राजकारण करतायत का, असं विचारल्यावर.. लेखक काय राजकारण करणार, तो फक्त आपल्या मनातलं कागदावर उतरवत असतो. लेखक हे आपल्या समाजाचा स्वाभिमान सांभाळणारा माणूस आहे आणि तो त्याचं काम करतोय असंही ते म्हणाले. पुरस्कार परत करायचा असेल तर तो मी सरकारला परत करणार नाही. हा पुरस्कार अकादमीचा आहे. पण भीती आहे की जर अकादमीमध्ये सरकारी व्यक्ती बसवला तर लेखकांचं स्वातंत्र्य हिरावलं जाईल असं मतही गुलजार यांनी व्यक्त केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close