मुख्यमंत्री सहायता निधीतून नृत्य कार्यक्रमावर 8 लाखांची उधळण

October 24, 2015 3:03 PM0 commentsViews:

cm_nidhi_bank24 ऑक्टोबर : राज्यात भीषण दुष्काळ परिस्थिती असताना राज्य सरकारने मुख्यमंत्री सहायता निधीतून बँकॉक इथं होणार्‍या नृत्य कार्यक्रमासाठी आठ लाख रुपये मंजूर केल्याची बाब उजेडात आलीये. माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली असून या निर्णयामुळे मुख्यमंत्री विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे.

नैसर्गिक आपत्तीजनक परिस्थिती आणि दुर्बल घटकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी उभारण्यात आलाय. राज्यात दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्यात आलीये. राज्यभरातून दुष्काळग्रस्त भागांना मदत देण्यासाठी अनेक हात पुढे आले आहे. एवढंच नाहीतर शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ निधीत जमा केले आहे. असं असताना मुख्यमंत्री सहायता निधीतून नृत्य कार्यक्रमासांठी आठ लाखांची खैरात वाटण्यात आलीये. बँकाकमध्ये 26 ते 30 डिसेंबर दरम्यान हा नृत्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात 15 सरकारी कर्मचारी सहभागी झाले आहे. यासाठी विशेष बाब म्हणून तब्बल आठ लाख रुपये मंजूर केल्याची माहिती आर टी आय कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकारातून मिळालीय. राज्यात दुष्काळ पडला असताना अशाप्रकारे एका नृत्याच्या कार्यक्रमासाठी निधी देणं, योग्य आहे का, असा सवाल आता उपस्थित होतोय. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत अजू कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीय. तर मुख्यमंत्री सहायता निधी सहा विभागांमध्ये विभागण्यात येते. या सहाही विभागांना निधी देता येतो. त्यामुळे हा निधी वेगळ्या कारणासाठी देण्यात आला नसल्याचंही बोललं जातंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close