फिल्म रिव्ह्यु : ‘ख्वाडा’

October 24, 2015 8:05 PM0 commentsViews:

अमोल परचुरे, समीक्षक

‘ख्वाडा’ म्हणजे खोडा किंवा अडथळा…ख्वाडा या शब्दाचे इतरही काही अर्थ असले तरी दिग्दर्शकाला अडथळा हाच अर्थ अभिप्रेत असावा… कारण आपण स्वतंत्र होऊन आता सत्तर वर्ष होत आली तरी जातीपातींचा ख्वाडा म्हणजेच अडथळा हा हटतच नाहीये. गरिबीचं जिणं आणि मागासलेल्या रुढी-परंपरांचं लोढणं या चक्रात अडकलेल्या एका कुटुंबाची ही गोष्ट आहे. अडथळ्यांची ही शर्यत वर्षांनुवर्ष आहे, महत्त्वाचं आहे ते एका कलाकृतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त वास्तवपणे जगापर्यंत पोचवणं.

Khwada-2015ख्वाडाने हे काम अगदी योग्य पद्धतीने केलेलं आहे. ‘फँड्री’ सिनेमात शेवटी कॅमेराच्या दिशेने भिरकावलेल्या दगडाचे अजूनही अर्थ निघतायत, आणि त्यातच ख्वाडा येऊन धडकलाय. भाऊराव कर्‍हाडेसारख्या अनेकांना व्यक्त व्हायचंय, सिनेमा हे फक्त मनोरंजनाचं माध्यम नाही हे जगाला ओरडून सांगायचंय… त्यांनी साद घातलीये, त्यांना प्रतिसाद द्यायला हवाय, ख्वाडा जास्तीत जास्त संवेदनशील प्रेक्षकांनी बघायलाच हवा आणि आपल्या आसपास काय चाललंय ती वेदना समजून घ्यायला हवी. ख्वाडाला आर्ट सिनेमाच्या वर्गवारीत कैद करू नये, अन्याय, अत्याचाराच्या ज्या घटनांबद्दल तुम्ही बातम्यांमधून माहिती घेता, त्याहीपेक्षा खोलवर जाऊन आपल्याच समाजाचं भेसूर चित्र दाखवणार्‍या या सिनेमाने कदाचित तुमचं मनोरंजन होणार नाही, पण हा सिनेमा तुम्हाला विचार करायला भाग पाडेल हे नक्की…

काय आहे स्टोरी ?

khwada_454सिनेमाच्या सुरुवातीलाच आपल्याला दिसत ओसाड माळरानावर फिरणारी धुळीची वावटळ…एका गरीब कुटुंबाच्या दुष्टचक्राचं प्रतीकच जणू…चार्‍याच्या शोधात एका गावातून दुसर्‍या गावात भटकणार्‍या एका धनगर कुटुंबाची ही गोष्ट… कुटुंबाचा प्रमुख आहे रघू, ज्याला बाळा आणि पांडू ही दोन मुलं आहेत. पांडूचं लग्न झालंय, त्याला मुलं-बाळं आहेत आणि आता बाळाचंही लग्न ठरतंय. स्वत:ची जमीन सरकारने वनजमीन कायद्यांतर्गत ताब्यात घेतल्यामुळे रघूच्या कुटुंबावर ही वेळ आलीये.

जमीन सोडवण्यासाठी कोर्ट-कचेरी सुरू आहेच, आणि आता संकटात भर पडलीये ती सरपंच अशोकदादा पाटीलमुळे…आपण उच्च जातीतले, आपण कसेही वागू शकतो, या गुर्मीत वावरणार्‍या या सरपंचाने रघू आणि कुटुंबाचं जिणं मुश्कील करुन ठेवलंय आणि यातूनच बंडखोरी जन्माला आलीये. यातून दिग्दर्शकाला बर्‍याच गोष्टी सुचवायच्या आहेत, बंडखोरी तारक की मारक याचा विचार सध्यातरी त्याने समाजावरच सोडलाय, पण हा प्रश्न इतक्या
लवकर सुटणारा नाही, ख्वाडा असणारच हेही त्याला ओरडून सांगायचंय…यामुळेच कलाकृती म्हणून ख्वाडा महत्त्वाचा आहे.

परफॉर्मन्स

भाऊराव कर्‍हाडे या तरुण दिग्दर्शकाने एक ध्यास घेतला आणि बरेच अडथळे पार करत एक अख्खा सिनेमा पूर्ण केला. पहिलाच सिनेमा असूनही दिग्दर्शकीय नवखेपण कुठेही जाणवत नाही हे महत्त्वाचं, उलट काय सांगायचंय, कसं सांगायचंय हे दिग्दर्शकाला स्पष्टपणे माहिती आहे, हे सिनेमा बघून पटतंच आणि कौतुकही वाटतं. याच सिनेमातून काही चांगले कलाकारही इंडस्ट्रीला गवसले आहेत. बाळूची म्हणजे नायकाची भूमिका करणार्‍या भाऊसाहेब शिंदे याचा अभिनय लाजवाबच झालाय.

Khwada_2592959gसंवाद खूप कमी, बरंचसं काम एक्स्प्रेशन्सचं, पण अगदी कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे भाऊसाहेबने कमाल केलीये. त्याचं स्वप्नाळूपण ते त्याची बंडखोरी हा प्रवास त्याने उत्तम दाखवलाय. सर्वात कमाल दर्जाचं काम केलंय ते शशांक शेंडे या हरहुन्नरी कलाकारानं. हा अभिनेता आपल्याला इतक्या सिनेमात वेगवेगळ्या भूमिकांमधून दिसत असतो.

साधारण दर आठवड्याला या कलाकाराचे सिनेमे रिलीज होत असावेत इतका ओळखीचा चेहरा…पण या ख्वाडामध्ये आत्तापर्यंतचं सर्वात लक्षवेधी काम त्यांच्याकडून झालंय. रघूची बेफिकीरी, त्याची व्यथा, त्याचं हिशोबीपण, कुटुंबासाठीची काळजी असं बरंच काही शशांक शेंडे यांनी अक्षरश: जिवंत केलंय. याशिवाय सिनेमातल्या लहान मुलाची भूमिका असेल किंवा खलनायक सरपंचाची सर्वांनीच जीव ओतून काम केलेलं आहे.

रेटिंग 100 पैकी 80

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close