कशी झाली छोटा राजनला अटक?

October 26, 2015 8:16 PM0 commentsViews:

26 ऑक्टोबर : भारत सरकारच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये असणारा कुख्यात गँगस्टर छोटा राजन, उर्फ राजेंद्र सदाशिव निकालजे अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय. राजनला रविवारी इंडोनेशियाच्या बालीमध्ये अटक झाली. इंटरपोल, रॉ, ऑस्ट्रेलियन पोलिस आणि इंडोनेशियाचे पोलिस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.

छोटा राजन गेल्या 24 वर्षांपासून फरार आहे. त्यातली बरीच वर्षं त्यानं थायलंड आणि मलेशियात काढली. 2002मध्ये त्याच्यावर छोटा शकीलच्या गुंडांनी बँकॉकमध्ये हल्ला केला. शरीरात गोळ्या घुसूनही राजन बचावला, बँकॉकच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झााला, पण उपचारादरम्यान त्याने हॉस्पिटलमधूनच पळ काढला. त्यानंतर राजन भटकत होता, कधी या देशात तर कधी त्या देशात. भारताची गुप्तचर संस्था रॉ राजनवर पाळत ठेवून होती. त्याचे फोन्सही टॅप होत होते आणि छोटा शकीलचे गुंडही त्याच्या मागावर होते.

CSP08hPVAAATf7M

मलेशियात आपल्याला धोका आहे हे कळल्यावर गेल्या काही महिन्यांपासून राजन ऑस्ट्रेलियामध्ये होता. ऑस्ट्रेलियातलं सिडनी शहर आपल्यासाठी सुरक्षित आहे, असा त्याचा समज असावा. छोटा राजनने नवीन नाव धारण केलं मोहन कुमार. पण रॉ आणि इंटरपोलला त्याचा सुगावा लागला. त्यांनी ऑस्ट्रेलियन सरकारला बातमी दिली. छोटा राजनला याची कुणकुण लागली आणि त्यानं ऑस्ट्रेलियातून पळ काढत थेट इंडोनेशियातल्या बाली गाठलं. पण यावेळी त्याचे प्लॅन फसले. राजन आता सिडनीत नाही, अशी पक्की खबर ऑस्ट्रेलियन सरकारनं इंटरपोल, सीबीआय आणि इंडोनेशियन सरकारला दिली होती. त्यानुसार चक्र फिरली आणि रविवारी बाली विमानतळावर छोटा राजन इंडोनेशिया पोलिसांच्या तावडीत सापडला.

यात कौतुक केलं पाहिजे ते भारत, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियन सरकार आणि इंटरपोल यांच्यातील समन्वयाचं. आता पुढचे किमान 15 दिवस राजन इंडोनेशियात राहील आणि त्यानंतर त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू होईल. तोपर्यंत छोटा राजनवर रॉची बारीक नजर असेलच.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close