राऊतांची शाहरुखला धमकी

February 3, 2010 8:21 AM0 commentsViews: 6

3 फेब्रुवारीवातावरण गरम ठेवायला शाहरुख खान हा आयताच मुद्दा मिळाल्यानं शिवसेनेनं शाहरुख माफी प्रकरण चांगलंच तापवण्याचं ठरवलेलं दिसतंय. शाहरुखनं अमेरिकेएवजी मुंबईत वक्तव्य करून दाखवावं, अशी धमकीच आता सेनेनं दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही धमकी दिलीय. पाकिस्तानी खेळाडूंबाबत आपण जे बोललो होतो, त्यावर ठाम असल्याचं शाहरुखनं काल न्यूयॉर्कमध्ये म्हटलं होतं. त्यावर शाहरुखचा बंगला मुंबईत आहे हे त्याने विसरू नये, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. विनाकारण कुणी वाद निर्माण केला तरी माय नेम इज खान सिनेमाच्या व्यवसायावर त्याचा काहीच परिणाम होणार, नाही असा दावाही काल शाहरूखने केला होता. पण 'नको लफडा' म्हणून मुंबईतल्या थिएटर मालकांनी माय नेम इज खानची पोस्टर्स उतरवलीत.दुसरीकडे मुंबई ही सर्व भारतीयांची आहे, या राहुल गांधींच्या वक्तव्याचा 'सामना'तून समाचार घेणे सुरूच आहे. मुंबईबाबत वक्तव्य करून राहुल यांनी मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा घोर अपमान केला आहे, असं 'सामना'च्या आजच्या संपादकीयामध्ये लिहिण्यात आलंय. ज्यांनी पाकिस्तान निर्माण केले त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे गोडवे गावेत, हा विनोद असल्याचं त्यात म्हटलंय. मुंबईतल्या हिंदी भाषकांची काळजी करणा-या काँग्रेसला सीमाभागातल्या मराठी माणसांबद्दल कधी आपुलकी वाटलीय का, असा सवाल विचारण्यात आलाय. नेहरू-गांधी घराण्याची भूमिका नेहमीच महाराष्ट्रविरोधी राहिली, असा आरोप त्यात करण्यात आलाय.

close