कलबुर्गी हत्या प्रकरणात एका संशयिताचा खून?

October 28, 2015 8:55 PM0 commentsViews:

êÖêËêÖêËêÖê

28 ऑक्टोबर : प्रसिद्ध विचारवंत, साहित्यिक आणि कन्नड विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणातील एका संशयिताची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कलबुर्गीच्या हत्येच्या संशयित मारेकर्‍याच्या चेहर्‍याशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीचा मृतदेह बेळगावजळच्या खानापूरच्या जंगलात आढळला आहे. जो मृतदेह सापडला आहे, त्या व्यक्तीची पूर्ण ओळख पटेपर्यंत काहीही सांगता येणार नाही, अशी सावध भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

बेळगावजळच्या खानापूर इथल्या माणिकवाडी गावात 18 ऑक्टोबरला जंगलात एक मृतदेह आढळला. त्यानंतर या प्रकरणी बेळगाव पोलीसांना माहिती देण्यात आली. पोलीसांनी मृतदेह बघितल्यावर कलबुर्गी यांच्या हत्येनंतर जारी करण्यात आलेल्या रेखाचित्रामधील संशयित आरोपी रुद्र गौडा पाटील याच्या चेहर्‍याशी तो मिळता जुळता असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. छातीवर तिन गोळ्या झाडून या व्यक्तीचा अज्ञाताने खून केल्याचं पोलीसांना आढळलं आहे. मृत पावलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता कर्नाटक पोलीसांचं विशेष पथक बंगळुरूहून बेळगावमध्ये दाखल झालं आहे.

डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची 30 ऑगस्ट 2015 रोजी धारवाड इथे दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात घुसून निर्घृण हत्या केली होती. या धक्कादायक प्रकारने कर्नाटकातील साहित्य आणि शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली होती. त्याचे तीव्र पडसाद अजूनही उमटत आहेत. कलबुर्गीच्या हत्येच्या निषेधार्थ आणि वाढत्या असहिष्णुतेविरोधात अनेक साहित्यिकांनी आपले मानाचे पुरस्कार परत केलेत. त्यांच्या मारेकर्‍यांचा शोध सुरू होता, पण कुणीच सापडत नव्हतं. पोलिसांनी दोन संशयितांची रेखाचित्रं प्रसिद्ध केली होती, पण त्याचाही फार उपयोग झाला नव्हता. असं असतानाच, या संशयितांपैकी एका व्यक्तीच्या चेहर्‍याची साम्य असलेला मृतदेह कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात सापडलाय. त्यामुळे पोलीस तपासाला गती आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close