कल्याणमध्ये शिवसेना ठरला मोठा पक्ष, बहुमताची मात्र हुलकावणी

November 2, 2015 1:43 PM0 commentsViews:

kdmc_shivsena_win02 नोव्हेंबर : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं पुन्हा एकदा करून दाखवलंय. शिवसेनेनं एकहाती सत्ता राखण्यापर्यंत मजल मारली आहे. मात्र, 10 जागांमुळे बहुमताने हुलकावणी दिली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत सेनेनं दुप्पट जागांवर झेप घेतं आवाज शिवसेनेचाच सिद्ध करून दाखवलंय. तर भाजपने 42 जागा जिंकत दुसर्‍या स्थानावर झेप घेतलीये.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी रविवारी 117 जागांसाठी मतदान पार पडलं. पण, मतदानाआधी शिवसेना विरु द्ध भाजप असा सामनाच रंगला होता. शिवसेना आणि भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत आखाड्यात एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घालत कल्याण डोंबिवलीसाठी पॅकेजची घोषणा, स्मार्ट सिटी अशी आश्वासनं दिली.पण, मतदाराजाने शिवसेनेला पसंती देत आपलं मत सेनेच्या पारड्यात टाकलं.

आज मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून शिवसेनेनं आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. एवढंच नाहीतर ही आघाडी बहुमताचा आकडा पारही करून गेली. पण, अंतिम निकाली हाती आला असता शिवसेनेला 52 जागा मिळाल्यात. तर भाजपला 42 जागांवर समाधान मानावे लागले. सेनेचं एकहाती सत्ता राखण्याचं स्वप्न अवघ्या 10 जागांपासून दुरावलंय.

तर दुसरीकडे मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेसचं कल्याणमध्ये पानिपत झालं. या तिन्ही पक्षांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मनसेनं मागील निवडणुकीत 27 जागा पटकावल्या होत्या मात्र, यावेळी इंजिन मात्र चांगलंच घसरलं. मनसेच्या वाट्याला फक्त 9 जागा मिळाल्यात.

काँग्रेस-राष्ट्रवादीला दुहेरी आकडा गाठता आला नाही. काँग्रेसला 4 तर राष्ट्रवादीला फक्त 2 जागांवरच समाधान मानावे लागले. कल्याण डोंबिवलीची लढत खर्‍या अर्थाने शिवसेना विरुद्ध भाजप अशीच होती. शिवसेनेनं धडाकेबाज प्रचार करत एक मत ‘आपल्या’ बाळासाहेबांसाठी…हे सार्थ ठरवत भाजपला मोठा भाऊ असल्याचं दाखवून दिलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close