‘कल्याण’साठी सेना भाजपसोबत की राजना देणार ‘टाळी’ ?

November 2, 2015 6:33 PM0 commentsViews:

sena_bjp_mns_kdmc_result02 नोव्हेंबर : कल्याण-डोंबिवली पालिकाचा निकाल आता स्पष्ट झाला असून शिवसेनाच सर्वात मोठा पक्ष ठरलाय. पण, शिवसेनेला बहुमताने हुलकावणी दिलीये. शिवसेना 52 जागांवर विजयी झाली पण अवघ्या 9 जागांनी सत्तेची खुर्ची दुरावलीये. शिवसेनेला आता बहुमतासाठी भाजप किंवा मनसेची मदत घ्यावी लागणार आहे. पण, निवडणुकीच्या आखाड्यात भाजपसोबत ताणले गेले संबंध पाहात शिवसेना भाजपसोबत हातमिळवणी करेल की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. तर दुसरीकडे राज ठाकरे टाळी देतील की नाही हा पेच आहेच.

कल्याण डोंबिवलीची निवडणूक गाजली ती शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या शाब्दिक युद्धाने. त्यामुळे ‘कल्याण’ कुणाचं होणार ? या भोवती दोन्ही पक्षांनी युद्धासारखी निवडणूक लढवली. भाजपकडून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याण डोंबिवलीसाठी खिंड लढवली. तर उद्धव ठाकरेंनी मैदान गाजवत एक मत आपल्या बाळासाहेबांना असा प्रचार केला. अखेर आता निकालअंती मतदारारांनी शिवसेनेला कौल दिला. आज मतमोजणीत सकाळपासून शिवसेना आघाडीवर होती ते शेवटपर्यंत कायम राहिली. परिस्थिती अशी निर्माण झाली की शिवसेनेनं एकहाती सत्ता राखली असं जवळपास स्पष्ट झालं. उद्धव ठाकरेंही शिवसैनिकांसोबत जल्लोष करण्यासाठी ‘मातोश्री’वर कल्याणकडे रवाना झाले होते. पण, अंतिम निकालानंतर चित्रच पालटलं. शिवसेना 68 जागांवरून 52 जागांवर येऊन थांबली. तर भाजप 25 जागांवरून 42 जागेवर पोहचली. शिवसेना तर मोठा पक्ष ठरला पण बहुमताचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे उद्धव यांनी आपला दौरा रद्द करून डोंबिवलीमध्ये सेना नेत्याची महत्वपूर्ण बैठक बोलावली.

आता सत्ता स्थापन करण्यासाठी काही समीकरणं आखली जात आहे. शिवसेना आणि भाजपचे ताणलेले संबंध पाहता शिवसेना शक्यतो भाजपसोबत युती करणार नाही असं जाणकारांचं म्हणणंय. शिवसेनेनं जर मनसेसोबत युती केली तर बहुमताचा 61 जागेचा आकडा गाठता येईल. पण त्यासाठी टाळी कोण पुढे देणार हा पेचही निर्माण झाला. दुसरी शक्यता अशी की, शिवसेनेनं अपक्ष 9 उमेदवारांना सोबत घेतलं तर बहुमताचा तिढा सुटेल. आणि तिसरी अशी शक्यता वर्तवली जाते की, भाजप (42) + मनसे (9) + इतर (11) अशी महायुती जर झाली तर बहुमतासाठी 62 इतकी संख्या होते. पण, ही शक्यता कमी अशीच आहे. आता शिवसेना नेमका काय निर्णय घेते हे पाहण्याचं ठरणार आहे. दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेत हे पाहण्याचं ठरणार आहे.

संभाव्य समीकरणे

1. शिवसेना (52) + मनसे (9) = 61
2. शिवसेना (52) + अपक्ष (9) = 61
3. भाजप (42) + मनसे (9) + इतर (11) = 62

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close