हटतेय मंदी..बँकांमध्ये नोक-यांची संधी

February 4, 2010 1:42 PM0 commentsViews: 6

4 फेब्रुवारीमंदीमुळे नोक-या गमावलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. देशातल्या प्रत्येक सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरभरतीला सुरुवात झाली आहे. आणि यात सगळ्यात आघाडीवर आहे बँकींग सेक्टर. देशातील सगळ्यात मोठी बँक असणा-या SBI ने साडेचार हजार कर्मचा-यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. इतरही अनेक सरकारी बँकांमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात भरती होण्याची शक्यता आहे..SBI यावर्षी एकूण 35 हजार रिक्रुटमेंट्स करणार आहे. पहिल्या टप्प्यात 4 हजार 500 ऑफिसर्सच्या पदांसाठी परीक्षा घेण्यात येइल.यातील 2 हजार जागांची भरती ग्रामीण भागासाठी करण्यात येईल. SBI च्या या नोक-यांसाठी लेखी परीक्षा 11 मार्चला होणार आहे. जनरल कॅटेगरीतील उमेदवारांना ही परीक्षा देण्यासाठी बारावीत किमान 60 टक्के तर पदवीला किमान 55 टक्के मार्क्स असणे गरजेचे आहे. अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांना या नियमात सवलत देण्यात आली आहे. या उमेदवारांना बारावीला किमान 55 टक्के तर पदवी परीक्षेत कमीत कमी 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. शिवाय उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षादरम्यान असणे गरजेचे आहे. पण ज्या उमेदवारांकडे कृषीक्षेत्रात किंवा ग्रामीण भागात काम करण्याचा अनुभव आहे त्यांना या नियमात सूट दिली जाणार आहे.SBI पाठोपाठ बँक ऑफ बडोदाही 4 हजार कर्मचा-यांची भरती करणार आहे. यातील 2 हजार जागा ऑफिसर्ससाठी तर उरलेल्या 2 हजार जागा क्लार्कच्या पदांसाठी असतील. शिवाय बँक ऑफ इंडिया 3 हजार तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स ही सोळाशे कर्मचा-यांची भरती करणार आहे. या बँकांमध्ये प्रोबेशनल ऑफिसर्स आणि क्लार्क या पदांसोबतच आयटी, एचआर आणि मार्केटिंग विभागातही रिक्रुटमेंट्स होतील. यासाठी मोठ्या शहरांसोबतच लहान शहरांतील एमबीए आणि इंजीनिअरिंग कॉलेजमध्येही बँका जाणार आहेत.

close