भाजपलाच केडीएमसीत सोबत नको, मग आमचा मार्ग वेगळा -उद्धव ठाकरे

November 3, 2015 7:41 PM0 commentsViews:

uddhav-on-fadnavis03 नोव्हेंबर : कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता कुणाची याबाबत पेच अजूनही कायम आहे. सध्यातरी शिवसेनेला साथ कोणाची हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. भाजपला प्रयत्न करायचे असेल तर करू द्या, यावरून भाजपला आमच्यासोबत यायचं नाही, हे आता स्पष्ट झालंय अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. तसंच आम्ही आमचा मार्ग निवडणार असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

शिवसेनेच्या नेत्यांची, आमदारांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सेना भवनात बैठक झाली. आजच्या महत्वाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी भाजप विरोधात आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री शिवसेनेच्या कोणत्याच मंत्र्यांचे आणि आमदारांचे त्यांच्या विभागातील कामांच्या प्रस्तवांना मंजुरी देत नाही. त्यामुळे सत्तेत सहभागी असूनही काहीच कामं होतं नसल्याची तक्रार उद्धव ठाकरेंकडे मांडली. या तक्रारी नंतर उद्धव ठाकरे यांनी आमदारांना आणि मंत्र्यांना आश्वासन दिलं, की तुमचे जे काही कामांचे प्रस्ताव असतील ते माझ्याकडे आणा मी स्वत: ते प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मांडतो. महिन्यातून एकदा शिवसेना आमदार आणि मंत्री यांची एकत्र बैठक घेऊन मार्ग काढणार. सत्तेत राहुनही शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नसतील तर ‘शिवसेना भाजपच्या सत्तेच्या पालखीचे भोई होणार नाही’ असं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिलं. या बैठकीत कल्याण डोंबिवली माहापालिकेत सत्ता स्थापने संदर्भात काहीच चर्चा झाली नाही. पण शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा पुर्ण प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली नाही. उलट भाजपला आमच्यासोबत यायचं नाही, हे आता स्पष्ट झालंय, अशी प्रतिक्रियाही त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर दिलीये. आमचा मार्ग आम्ही निवडणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close