डाळीवरुन शिवसेना-भाजपात श्रेयाची लढाई

November 5, 2015 11:09 AM0 commentsViews:

uddhav-and-devendra 121

05 नोव्हेंबर : आजपासून 100 रुपये दरानं तूरडाळ उपलब्ध होणार अशी घोषणा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केली खरी. पण ही डाळ बाजारात येण्याआधीच तिच्या श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. शिवसेना – भाजपामध्ये फक्त गुरगुरणे होत नाही, सामान्यांचे महागाईसारखे प्रश्नही निकाली काढले जातात असं सांगत शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी 120 रुपये किलो दराने डाळ विकण्याचे आदेश दिल्याचा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तर भाजपाच्या प्रयत्नांमुळेच डाळीचे दर कमी झाल्याचे भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

ऐन दिवाळीत डाळीचे दर गगनाला भिडले होते. पण राज्य सरकार 120 रुपयांत डाळ विकणार असल्याची माहिती शिवसेनेने दिली होती. तर बुधवारी रात्री उशीरा राज्य सरकारने 100 रुपये प्रति किलो या दराने डाळ विकणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता डाळीच्या किंमतीवरुन भाजपा – शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांचे म्हणणं ऐकलं आणि तूरडाळ 120 रुपये किलो दराने विकण्याचे आदेश दिले. त्यामुळे दिवाळीत जनतेला दिलासा मिळेल असं उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. शिवसेना आणि भाजपामध्ये फक्त गुरगुरणे होत नाही, तर सामान्यांचे महागाईसारखे प्रश्नही निकाली लावले जातात हे विरोधकांनी लक्षात घ्यावं असंही त्यांनी सुनावलं आहे.

तर दुसरीकडे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी हे क्रेडीट मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. राज्यात 100रू किलोनं डाळ उपलब्ध होणं म्हणजे भाजपाच्या प्रयत्नाना यश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आभार, असं ट्विट काल (बुधवारी) आशिष शेलार यांनी केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close