असहिष्णूता आता वाढली नाही, ती 40 वर्षांपासून – विक्रम गोखले

November 6, 2015 12:48 PM0 commentsViews:

Vikram Gokhle121

06 नोव्हेंबर : असहिष्णूता ही काय पाच-सहा महिन्यामध्ये वाढली नाही, ती चाळीस वर्षापासून आहे. पुरस्कार परत करून काय 24 तासात सहिष्णुता निर्माण होणार नाही, असं परखड मत मत व्यक्त करत असहिष्णूतेबाबत बोलणार्‍यांवर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी जोरदार टिका केली आहे.

पुरस्कार परत करणे हा ज्याचा त्यांचा प्रश्न आहे. मी पुरस्कार हे कष्टाने मिळवलेत. त्यामुळे ते कदापि परत करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. भारतामध्ये लोकशाही नाही तर माकडचाळे आहे अशी टिप्पणी करताना लोकशाहीमध्ये विचारांनी, शब्दांनी आणि कृतीतून निषेध व्यक्त केला पाहिजे असं मत ही यावेळी अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले. ते मराठी रंगभूमी दिनानिमित्त गुरुवारी सांगलीमध्ये बोलत होते.

सांगलीमध्ये मराठी रंगभूमी दिनानिमित्त अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना विष्णुदास भावे पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना अभिनेते विक्रम गोखले यांनी देशात सुरु असलेल्या असहिष्णूतेचा वाद आणि पुरस्कार वापसी प्रकारबाबत जोरदार टीका केली आहे.

सध्या कोणालाही ट्रॅफिक सिग्नलवर रस्ता ओलांडणार्‍या भिकारी आणि आंधळ्यासाठी थ्थांबायला वेळ नाही, कसलेही कायदे पाळले जात नाहीत. मग कुठल्या असहिष्णुतेबाबत बोलता, असा सवाल त्यांनी केला आहे. ज्या घटनेसाठी हे पुरस्कार परत केले जात आहेत, त्याचा निषेध करत पुरस्कार परत करण्याऐवजी विचारांनी, शब्दांनी आणि कृतीतून निषेध केला पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी भारतीय म्हणजे थर्ड क्लास नसून टेन क्लास लोक आहोत अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत मी कोणताही पुरस्कार परत करणार नसल्याचे यावेळी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close