सीबीआयचा मीडियाला चकवा, घडवलं नकली राजन नाट्य

November 6, 2015 4:33 PM0 commentsViews:

कौस्तुभ फलटणकर, नवी दिल्ली

06 नोव्हेंबर : छोटा राजनला आज अखेर भारतात आणण्यात आलं..पण त्याच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये आणि विमानतळापासून सीबीआय मुख्यालयातच्या प्रवासात मीडियाया ससेमिरा चुकावा, यासाठी सीबीआयने चक्क डमी ताफ्याची क्लुप्ती उपयोगात आणली.पाहुयात आज दिल्लीत सीबीआयने मीडियाला नेमका कसा चकवा दिला तो…

rajan_media_cbiछोटा राजनला सीबीआयनं बालीहून स्पेशल फ्लाईटने दिल्लीच्या पालम विमानतळावर आणलं खरं…पण त्याला सीबीआयच्या हेडक्वॉटरपर्यंत नेमकं कसं न्यायचं हा प्रश्न सीबीआयच्या अधिकार्‍यांना कालपासूनच सतावत होता. कारण काही केलं तरी प्रसारमाध्यमांचे कॅमेरे छोटा राजनच्या ताफ्याचा पाठलाग करणारच होते. म्हणूनच मग मीडियाचा ससेमिरा चुकवण्यासाठी सीबीआयने एक मास्टर प्लॅन बनवला.

या प्लॅननुसार मग सीबीआयने रात्रीतून एक डमी छोटा राजन तयार केला आणि साडेपाचच्या सुमारास छोटा राजन डमी ताफा विमानतळाबाहेर काढला. माध्यमं देखील सीबीआयच्या जाळ्यात अलगद अडकली आणि या डमी ताफ्याचा पाठलाग करू लागली.पण या ताफ्यात प्रत्यक्षात छोटा राजन नव्हताच…कारण सीबीआयने माध्यमांचे कॅमेरे विमानतळावरून हटल्यानंतर यथावकाश खर्‍या छोट्या राजनला दुसर्‍या मार्गाने सीबीआय मुख्यालयात पोचवलं.

पण तरीही या चकव्याची कुणकूण लागताच सीबीआय हेडक्वॉटर बाहेर थांबलेल्या प्रसार माध्यमांनी छोटा राजनला कॅमेर्‍यात टिपण्याचा प्रयत्न केला पण त्यातही ते फारसे यशस्वी झाले नाहीत. अशा पद्धतीने सीबीआयने कॅमेर्‍यांचा ससेमिरा चुकवण्यासाठी मीडियाला व्यवस्थित चकवा दिला.

चकवा कशासाठी ?

छोटा राजनने भारतात येण्यापूर्वी मुंबई पोलिसांतले काही अधिकारी आणि दाऊद गँगमध्ये लागेबांधे असल्याचा खळबळजणक आरोप
केला होता. तसंच भारतात आल्यानंतर आपल्या जीवाला धोका असल्याचं त्याने म्हटलं होतं. म्हणूनच पालम विमानतळ ते सीबीआय हेडक्वॉटरच्या प्रवासादरम्यान छोटा राजनच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठीच सीबीआयने डमी ताफ्याचा खुबीने वापर केला आणि त्यात ते यशस्वी देखील झाले.

पण या चकव्यामुळे छोटा राजनचा लाईव्ह पाठलाग करण्यासाठी आतूर असलेल्या मीडियावाल्यांचा चांगलाच हिरमोड झाला. दरम्यान, छोटा राजनचे सर्व गुन्हे सीबीआयला देण्यात आलेत. त्यावर माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंह यांनी टीका केलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close