… अन् दुष्काळग्रस्त परभणीत बहरली झेंडूची शेती!

November 10, 2015 5:11 PM0 commentsViews:

पंकज क्षीरसागर, परभणी

10 नोव्हेंबर : गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा दुष्काळाच्या झळा सोसतोय. दुष्काळामुळे अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केलीये, तर अनेकजण स्थलांतरित झाले आहेत. काही शेतकर्‍यांनी मात्र यावर उपाय शोधून काढला आणि दुष्काळावर मात करत शेती फुलवली, नफाही मिळवला.

Zendu flowers

जिंतूर तालुका, परभणी जिल्ह्यातील कायमचा दुष्काळी भाग. याच तालुक्यातल्या 800 लोकवस्तीच्या शेवडी गावात दाखल होताच झेंडुच्या फुलांचा मळा तुम्हाला आकर्षित करून घेतो. तुमची नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला इथं फक्त झेंडूचीच शेती दिसेल.

दुष्काळग्रस्त गावांमध्ये शेवडीचाही समावेश आहे. मात्र जलयुक्त शिवाराची काम झाल्यानं, गावातल्या विहिरींना पाणी आलं. या पाण्याचं नियोजन करत गावातल्या आश्रोबा सानप यांनी पहिल्यांदा हा प्रयोग केला. पाच एकर शेतीपैकी केवळ 10 गुंठ्यात त्यांनी झेंडुची शेती केली आणि 60 हजारांचं उत्पन्न काढलं. त्यानंतर संपूर्ण गावानं त्यांचा कित्ता गिरवला.

या गावातल्या एकाही शेतकर्‍यानं गेल्या दोन वर्षात आत्महत्या केली नाही. इथला झेंडू थेट हैदराबादपासून मुंबईपर्यंत जातो. तीन वेगवेगळ्या प्रकारच्या झेंडूची लागवड इथं केली जाते.

पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता, प्रयोगशील शेती केली तर ती फायदेशीर ठरते, त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close