मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला

February 8, 2010 10:35 AM0 commentsViews: 1

5 फेब्रुवारीमुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शरद पवारांच्या 'मातोश्री' भेटीचा चांगलाच समाचार घेतला आहे. राज्यात होणार्‍या आयपीएलच्या सर्व मॅचेसना सुरक्षा पुरवू. कोणतीही अघटीत घटना घडल्यास त्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. सरकार कोणाच्याही धमक्यांना भीक घालणार नाही. आणि राज्यात केवळ सरकारचे राज्य आहे. दुसरे सत्ता केंद्र नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांचा हा सगळा रोख पवारांच्या कालच्या 'मातोश्री' भेटीवर होता.आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी पवारांवर थेट टीका करणे टाळले. पण वरीलप्रमाणे बोलून त्यांनी पवार-ठाकरे भेटीचा समाचार घेतलाच. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळू द्यावे याबाबत ठाकरेंचे मन वळवण्यासाठी पवार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर काल 'मातोश्री'वर गेले होते. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्याविषयी त्यांनाच विचारा, असे चव्हाण म्हणाले. पण आयपीएलला सुरक्षा मागण्यासाठी कोणाकडे जाण्याची गरज नसल्याचेही ते याच पत्रकार परिषदेत म्हणाले. 'माय नेम इज खान' या सिनेमाला आम्ही सुरक्षा देणार आहोत. एवढेच नाही तर कुटुंबासमवेत जाऊन हा सिनेमा आपण पाहणारआहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. यामुळे आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला आहे, हे निश्चित.

close