भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर, ज्येष्ठांच्या टार्गेटवर मोदी-शहा !

November 12, 2015 3:16 PM0 commentsViews:

 

modi_amit_shah_advani12 नोव्हेंबर : बिहारमध्ये दारुण पराभवानंतर भाजपमध्ये दिवाळीत चांगलाच शुकशुकाट पसरलाय. आता तर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींसह इतर नेत्यांनी मोदी आणि अमित शहांविरुद्ध नाराजीचे फटाके फोडण्यास सुरुवात केलीये. भाजप नेतृत्वाने आमच्याशी चर्चा करायला हवी अन्यथा पुढचा निर्णय घेऊ असा इशाराच त्यांनी दिलाय.

बिहार विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जोडीने विकास आणि जातीयतेच्या मुद्यावर प्रचार केला खरा पण, स्थानिक नेत्यांची मोट बांधण्यात आणि स्थानिक मातीशी गंध नसल्यामुळे लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवामुळे भाजपला चांगलाच हादरा बसलाय. अरुण जेटलींसह इतर नेत्यांनी पराभव स्वीकारत पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं म्हटलंय. पण, मोदीपर्वापासून अडगळीत पडलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आता हातात चालून आलेल्या संधीचा फायदा घेण्यास सुरुवात केलीये. अपेक्षेप्रमाणे अडवाणींसह ज्येष्ठ नेत्यांनी नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांना फटकारलं खरं पण त्यानंतर संघर्ष अधीक चिघळलाय. पराभवाला मोदी आणि अमित शहा जबाबदार नाहीत या पक्षाच्या निवेदनावर ज्येष्ठ नेते समाधानी नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप नेतृत्वानंच आपल्याशी चर्चा करायला हवी, अशी ज्येष्ठ नेत्यांची मागणी आहे. जर असं झालं नाही तर पुढचा निर्णय घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी लालकृष्ण अडवाणी आणि यशवंत सिन्हा यांची भेट घेतल्याचंही समजतंय. आधीच ऐन सणासुधीच्या काळात पराभवामुळे दुखात बुडालेल्या भाजप पक्षात आता ज्येष्ठांनी आपल्या ज्येष्ठतेच्या चार गोष्टी सुनावण्याचा फैसला केलाय. नरेंद्र मोदी आज ब्रिटनच्या दौर्‍यावर रवाना झाले आहे. पण, त्यांच्या पश्चात पक्षात आता आणखी फटाके फुटणार असं चित्र दिसतंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close