भारत हा बुद्ध आणि गांधींचा देश, असहिष्णुता सहन केली जाणार नाही -मोदी

November 12, 2015 10:20 PM0 commentsViews:

modi_uk_speech12 नोव्हेंबर : देशभरात असहिष्णुतेच्या मुद्यावर सुरू असलेल्या वादंगावर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलं. ब्रिटन दौर्‍यावर संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींनी भारत हा भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश आहे. भारत हा लोकशाहीचा देश असून इथं असहिष्णुता सहन केली जाणार नाही असं परखड मत मोदींनी व्यक्त केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तीन दिवसांच्या ब्रिटन दौर्‍याला सुरुवात केली. देशभरात असहिष्णुतेच्या वातावरणाविरोधात साहित्यिकांनी पुरस्कारवापसी आंदोलन सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीमुळे अपेक्षेप्रमाणे याचे पडसाद मोदींच्या दौर्‍यावर उमटले. काही साहित्यिकांनी पंतप्रधान डेव्हिड केमरुन यांच्याकडे मोदींवर दबाव आणण्याचा प्रयत्नही केला. संयुक्त पत्रकार परिषदेत सामाजिक तणावाबद्दल मोदींना विचारणा झाली. यावर मोदींनी आपलं परखड मत नोंदवलं. भारत हा लोकशाहीचा देश आहे. आम्ही अशा हिंसक घटनेच्या विरोधात असून अशा वृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई केली जाईल. मुळात भारत हा भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांचा देश आहे. इथं प्रत्येकांच्या विचाराचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. येणार्‍या काळात अशा वृत्तींचा नायनाट करण्यासाठी कारवाई केली जाईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

तसंच मला ब्रिटनमध्ये येण्यापासून कोणीही रोखले नाही. गुजरात दंगलीनंतर आपण 2003 ला ब्रिटनमध्ये आलो होतो त्यावेळी चांगले स्वागतही झाले होते. मला यूकेमध्ये येण्यापासून कुणी रोखले नाही असंही मोदींनी स्पष्ट केलं. या परिषदेच्या अगोदर दोन्ही देशांमध्ये संबंध आणखी दृढ करण्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

दोन्ही देशांमध्ये अणुकरारावर स्वाक्षरी करण्यात आली. डेव्हिड केमरुन आणि मोदींनी निवेदन देत अणुकरारावर स्वाक्षरी झाल्याची घोषणा केली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या सहभागासाठी ब्रिटनने केलेल्या समर्थनाचं मोदींनी आभार मानले. भारत आणि ब्रिटन हे दोन्ही देश लोकशाहीने संपन्न देश आहे. त्यामुळे स्वाभाविकच दोन्ही देशांमध्ये संबंध जोडले जातील असं मत केमरुन यांनी व्यक्त केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close