ज्‍येष्‍ठ नेत्‍यांच्‍या विरोधात कारवाईचा प्रश्नच उद्भवत नाही – गडकरी

November 13, 2015 4:39 PM0 commentsViews:

nitin_gadkari

13 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर बेजबाबदार टीका करणार्‍यांवर कारवाई करा, अशी मागणी करणार्‍या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांतच घुमजाव केला आहे. आपण अशी कोणतीच मागणी केली नसल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर बिहार निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर पक्षातील ज्येष्ठ आणि मार्गदर्शक नेत्यांनी व्यक्त केलेल्या मुद्द्यांवर केंद्रीय नेतृत्त्व त्यांच्याशी चर्चा करत असल्याचंही गडकरी यांनी शुक्रवारी सांगितलं. नागपूरमध्ये निवेदन प्रसिद्ध करून गडकरी यांनी आपल्या आधीच्या वक्तव्यावरून घुमजाव केलं.

ते म्हणाले, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे आमचे आदरणीय नेते आहेत. आतापर्यंत मी किंवा पक्षातील अन्य कोणीही त्यांच्याबद्दल अनादर व्यक्त केलेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कोणतंही स्पष्टीकरण मागण्याचा किंवा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अमित शहा यांच्याकडे मी अशी मागणी केली असल्याच्या बातम्या निराधार असल्याचही नितीन गडकरी यांनी निवेदनात म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close