फिल्म रिव्ह्यु : कट्यार काळजात घुसली

November 13, 2015 3:54 PM0 commentsViews:

अमोल परचुरे, समीक्षक

कट्यार काळजात घुसली… पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेलं एक महाकाव्यच… संगीत हा विषय केंद्रस्थानी ठेवून दोन संगीत घराण्यांमधला, दोन गायकींमधला संघर्ष उभा करणं, त्यातला संदेश हा पिढ्यान्‌पिढ्या टिकून राहील एवढा सशक्त असणं ही किमया दारव्हेकरांच्या लेखणीची… या लेखनाला जोड मिळाली ती अभिषेकी बुवांच्या संगीताची आणि तितक्याच ताकदीच्या कलाकारांची… हे झालं नाटकाचं, पण जे नाटकात घडलं अगदी तसंच सिनेमातही घडलंय. नाटकावरून किंवा पुस्तकावरून तयार झालेला सिनेमा पाहिला की बर्‍याचदा असं वाटतं की ओरिजनल ते ओरिजनल…पण कट्यारच्या बाबतीत असं घडत नाही… सुरांची बरसात झेलून, अगदी तृप्त मनानं आपण थिएटरबाहेर पडतो आणि सिनेमा आपल्या मनात बराच काळ रुंजी घालत राहतो. कट्यारचं कठीण आव्हान सुबोध भावे आणि टीमने ज्या आत्मविश्वासाने पेललंय त्याला दाद द्यायलाच हवी. ज्यांना कट्यारबद्दल माहिती आहे, त्यांच्यासाठी नॉस्टॅल्जियाचा आनंद आणि जे कट्यारबद्दल ऐकून आहेत त्यांना सकस आणि सशक्त कलाकृती बघितल्याचा आनंद मिळणं हेच सुबोध भावेचं खरं यश म्हणायला पाहिजे.

sdasdapy

राजगायक पंडित भानुशंकर आणि खाँसाहेब आफताब हुसैन यांच्या गायकीची, यांच्यातील घराण्याच्या संघर्षाची ही गोष्ट… पंडितजींपेक्षा आपली गायकी श्रेष्ठ आहे हे सिध्द करण्याचा खाँसाहेबांचा ध्यास… खरं तर दोघेही सर्वोत्तम दर्जाचे कलाकार, पण पंडितजींचा स्वभाव त्यांच्या गायकीसारखाच मृदू… त्यांचं गायन ऐकून लोक भान हरपतात आणि टाळ्या वाजवायलाही विसरतात. खाँसाहेब आणि त्यांची गायकी पंडितजींपेक्षा अगदी उलट प्रकृतीची… खाँसाहेबांची गायकी आक्रमक आणि हरकतींनी भारलेली…ही गायकी रसिकांना डोलायला लावते… सच्च्या कलाकाराची कदर न करता स्वत:च्या घराण्याचा अभिमान बाळगणारे खाँसाहेब जिंकूनही हरतात, त्याची ही गोष्ट… अनेक वळणंवळणं घेत, माणसांच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू दाखवत हा सगळा पट मांडलेला आहे. यात शिष्याची व्यथा आहे, खर्‍या साधकाची त्यागवृत्ती आहे, द्वेषाचं राजकारण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वरांचा उत्सव आहे, मन दीपवून टाकणारी, तल्लीन करायला लावणारी सुरांची मैफल आहे, अशा मैफलीत नक्की हजेरी लावा…

खरंतर सुबोध भावेने पंडितजींच्या भूमिकेसाठी शंकर महादेवन आणि खाँसाहेबांसाठी सचिन पिळगावकर यांची निवड केली इथेच अर्धी बाजी मारली असं आता म्हणता येईल. शंकर महादेवन यांच्या आवाजातली गाणी आपण बरीच ऐकली, पण प्रत्यक्ष शंकर पडद्यावर बसून गातोय, याचा खूप मोठा फरक पडतो. सचिन पिळगावकर यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीतला हा त्यांचा सर्वोत्तम अभिनय आहे. गंभीर भूमिकेत जी जान त्यांनी ओतलीये, त्याला सलामच करावासा वाटतो. खाँसाहेब म्हणजे खलनायक नाही हे ठसवून त्यांनी प्रेक्षकांना आपलंसं करून टाकलंय.

संगीताची साधना महत्त्वाची, घराणं नाही…कलेचा आनंद घेणं हे महत्त्वाचं…संगीताला कोणत्याही सीमा किंवा बंधनं असू शकत नाहीत… हा संदेश देण्याचा प्रयत्न सिनेमात आहे आणि धर्माधर्मांमध्ये भिंती उभारून वातावरण खराब होण्याच्या सध्याच्या काळात हा संदेश किती महत्त्वाचा आहे हे सुध्दा लक्षात घेतलं पाहिजे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close