फिल्म रिव्ह्यु : मुंबई-पुणे-मुंबई २

November 13, 2015 3:00 PM0 commentsViews:

अमोल परचुरे, समीक्षक

मुंबई पुणे मुंबई या सिनेमाचा सिक्वल, त्या सिनेमाचा पुढचा भाग ऐन दिवाळीत रिलीज झालाय. मुंबई पुणे मुंबई नंतर सतीश राजवाडेचे जे सिनेमे आले ते फारसे चालले नाहीत, तो प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही, पण मुंबई पुणे मुंबईच्या दुसर्‍या भागातून तो पुन्हा फॉर्ममध्ये आलाय असं म्हणता येईल. लग्नाची गोष्ट, लग्नाची दुसरी गोष्ट वगैरे फक्त टायटल्स होती, पण एका लग्नसोहळ्याची पूर्ण गोष्ट दाखवणारा हा पहिलाच मराठी सिनेमा असावा. एकूण सणासुदीच्या काळातलं सिनेमाचं टायमिंग चांगलं आहे आणि त्यात लग्नाचा विषय असल्यामुळे लग्नाच्या बैठकीपासून ते बोहल्यावर चढेपर्यंत प्रत्येक गोष्टीत मराठी माणसांना इंटरेस्ट… पण फक्त एवढाच इंटरेस्ट समोर न ठेवता आणि हम आपके है कौनसारखी लग्नाची DVD न बनवता थोडा वेगळा विचारही सतीशने केलेला आहे हे विशेष…

mumbai-pune-mumbai-2-trailer-video
गौरी आणि गौतमच्या लग्नाची गोष्ट लिहिताना सतीश राजवाडेने तमाम मुलींसाठी महत्त्वाचा असलेला विषय हायलाईट केलाय. लग्न करून दुसर्‍या घरात जायचं, आपल्या सवयी बदलायच्या, आई-वडिलांपासून लांब राहायचं याचं मुलींवर दडपण असतंच, पण आपल्या सिनेमातून म्हणावं तितकं याकडे लक्ष देण्यात आलेलं नाही. मुलीची पाठवणी करतानाचे सीन्स टाकून महिलावर्गाला रडवण्याचं कामच इतकी वर्षं झालेलं आहे, पण लग्न ठरल्यापासून ते प्रत्यक्ष होईपर्यंत तिच्या मनात किती घालमेल असेल याचा बारकाईने विचार या सिनेमात झालाय. आजच्या काळातली मुलगी, जी स्वत: कमावते, जी स्वत:चे निर्णय स्वत: घेते, ती प्रेमात पडल्यावर जरी तिला घरातून पाठिंबा असेल तरीही घर आणि शहर सोडावं लागणार म्हटल्यावर तिची काय अवस्था होत असेल याचा विचार आजच्या प्रेक्षकानं करावा यासाठी चांगला प्रयत्न सिनेमातून झालाय असं म्हणावं लागेल.

मुख्य जोडी आहे अर्थातच मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी…यामध्ये मुक्ताचा अभिनय खूपच चांगला झालेला आहे. स्वप्नीलपेक्षा तिची आपल्या आई-वडिलांबरोबर असलेली केमिस्ट्री खूपच छान रंगलीये. भावूक करणारे सिनेमातले क्षण हेच सिनेमाचा हायलाईट ठरलेत. प्रशांत दामले, मंगला केंकरे, विजय केंकरे, सविता प्रभुणे आणि सुहास जोशी या अनुभवी कलाकारांनी केलेली बॅटिंग सिनेमासाठी अतिशय उपयुक्त ठरलेली आहे. अंगद म्हसकर आणि श्रुती मराठे यांचं कामही चांगलं झालंय. प्रियकराच्या भूमिकेत अंगद एकदम फिट्ट बसलाय. आसावरी जोशी हिने साकारलेली आधुनिक विचारांच्या मावशीची भूमिकाही छान केलीये. एकूणच अभिनयाच्या बाबतीत सिनेमा ताकदवान आहे, फक्त क्लायमॅक्सकडे येत असताना दोन-दोन ओळींच्या कवितांचा पसारा आवरता आला असता तर आणखी मजा आली असती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close