बाळासाहेबांचा तिसरा स्मृतिदिन, आज स्मारकाच्या घोषणेची शक्यता

November 17, 2015 7:25 AM0 commentsViews:

balasaheb Smruti

17 नोव्हेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (मंगळवारी) तिसरी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातून हजारो शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवरच्या स्मृतिस्थळावर दाखल होत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह स्मृतिस्थळावर उपस्थित राहणार आहेत.

आज दिवसभरात सर्वच पक्षांतील प्रमुख नेते बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी स्मृतिस्थळावर येणार आहेत तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळावर येऊन बाळासाहेबांना अभिवादन करून त्यांच्या स्मारकासाठीच्या जागेची घोषणा करण्याची शक्यता आहे.

मुंबईतील महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं भव्य स्मारक उभारण्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा मानस असल्याची माहिती IBN लोकमतला सूत्रांकडून मिळाली आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकत्र शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या जागेची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा मुद्दा निकाली निघणार आहे.

दरम्यान, आज शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी मुंबईसह राज्यातून शिवसैनिक येणार आहेत. मात्र गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही राज ठाकरे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या स्मृतिस्थळावर जाणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close