विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांचं निधन

November 17, 2015 4:46 PM0 commentsViews:

Ashok Singhal17 नोव्हेंबर : विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि आंतराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अशोक सिंघल यांचं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. गेले काही दिवस सिंघल यांच्यावर ह्रदय आणि किडनीच्या विकारांवर उपचार सुरू होते. मागील आठवड्यात गुरुवारी त्यांना गुडगाव येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

अशोक सिंघल यांचा जन्म 15 सप्टेंबर 1926 साली आग्रा इथं झाला होता. त्यांचे वडील हे सरकारी अधिकारी होते. सिंघल यांनी वाराणसी येथील हिंदू विश्व विद्यालयातून इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. इंजिनियरिंग शिक्षण घेतल्यानंतर 1942 साली सिंघल यांनी संघासाठी पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1980 साली विश्व हिंदू परिषदेत कामाला सुरुवात केली. दलितांविरोधात तिरस्कार आणि धर्मांतर रोखण्यासाठी त्यांनी काम केलं. मीनाक्षीपुरमच्या धर्मांतरानंतर दलितांसाठी 200 मंदिरं बांधली. देशात हिंदुत्वाचा प्रचार आणि एकत्र आणण्यासाठी 1984 साली त्यांनी दिल्लीत पहिली धर्मसंसद भरवली. या धर्मसंसदेनंतर अयोद्धेतील रामजन्मभूमी चळवळीला सुरुवात झाली. एकीकडे भाजपच्या नेत्यांनी राम मंदिरासाठी आंदोलन उभारले होते पण अशोक सिंघल यांच्या पुढाकारामुळे देशभरात या चळवळीचा विस्तार झाला. या आंदोलनात देशभरातून कार्यकर्ते जोडले गेले. सिंघल यांनी पंडित ओमकार ठाकूर यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडेही घेतले. सिंघल यांनी 20 वर्षं विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्षपद भूषवलं. ज्या ज्या वेळी राम मंदिराच्या आंदोलनाचा मुद्दा समोर आला तेव्हा अशोक सिंघल यांचं नाव आवर्जून घेतले जातं. सिंघल यांनी देश आणि विदेशात विहिंपला एक वेगळी ओळख मिळवून दिली.

अशोक सिंघल यांचं अल्पपरिचय

- 1926 साली आग्रा इथं जन्म
- बनारस हिंदू विद्यापीठातून इंजिनीअरिंगची पदवी
- 1942 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून कामाला सुरुवात
- 1980 साली विश्व हिंदू परिषदेत कामाला सुरुवात, चार वर्षांत सरचिटणीस झाले
- 20 वर्षं विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष होते
- मीनाक्षीपुरमच्या धर्मांतरानंतर दलितांसाठी 200 मंदिरं बांधली
- 1984 साली दिल्लीत पहिली धर्मसंसद भरवली
- अयोध्येतील रामजन्मभूमी चळवळीचे प्रणेते

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close