शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

November 19, 2015 4:36 PM0 commentsViews:

19 नोव्हेंबर : कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्यावर आज (गुरूवारी) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलं. सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी या त्यांच्या मुळगावी महाडिक यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लष्कराकडून कर्नल संतोष महाडिक यांना मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज सकाळी कर्नल महाडिक यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील काल (बुधवारी) रात्री महाडिक यांना श्रद्धांजली वाहिली होती. याशिवाय, पोगरवाडीत महाडिक यांच्या अंत्यदर्शनासाठी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, सातार्‍याचे पालकमंत्री विजय शिवतारे, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि सोलापूरचे छत्रपती मालोजीराजे भोसले आणि अन्य राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी महाडिक यांच्या अंत्यदर्शनासाठी आजुबाजूच्या गावातील नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती.

sdasday

श्रीनगर इथल्या बेस कँपवर लष्कराकडून मानवंदना देण्यात आल्यानंतर संतोष महाडिक यांचे पार्थिव हवाई दलाच्या खास विमानाने पुण्याच्या लोहगाव विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर सातार्‍याच्या जिल्हा रूग्णालयात आणि आरेदारे गावात त्यांचे पार्थिव काहीवेळासाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

कुपवाडा जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हाजी नाका परिसरातील दाट जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या 41 राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक (39) शहीद झाले होते. महाडिक हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

दाट जंगलाच्या परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यानंतर शोधमोहिम हाती घेण्यात आली होती. तिचे नेतृत्त्व कर्नल संतोष महाडिक करीत होते. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिथे त्यांना वीरगती प्राप्त झाली. 1998 मध्ये ते लष्करात विशेष दलात दाखल झाले आणि अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना सेना पदकाने गौरवण्यात आलं होतं.

दरम्यान, अतिरेक्यांशी लढताना धारातीथच् पडलेल्या भारताच्या वीरपुत्राच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुण्यात शहीद कर्नल संतोष महाडिक यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली. संपूर्ण देश आणि महाराष्ट्र महाडिकच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून त्यांची जबाबदारी सरकार घेईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणालं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close