बाळासाहेबांच्या महापौर बंगल्यातल्या स्मारकाला नारायण राणेंचा विरोध

November 19, 2015 8:20 PM0 commentsViews:

Naraynabfan

19 नोव्हेंबर :  मुंबईतील महापौर बंगल्यात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या वादात आता काँग्रेस नेते नारायण राणे यांनीही उडी घेतली आहे. सरकारने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता महापौर निवासस्थानात बाळासाहेबांच्या स्मारकाला जागा दिल्याचा आरोप राणेंनी केला आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी सरकार वाचवण्यासाठी महापौर बंगल्यात स्मारकाला मंजुरी दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

एकेकाळी बाळासाहेब यांच्या अतिशय जवळचे मानले जाणार्‍या नारायण राणे यांनी आज (गुरूवारी) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन स्मारकाच्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला आमचा विरोध नाही. त्यांचं स्मारक मुंबई किंबहुना दादर परिसरात व्हावं असं माझं प्रामाणिक मत आहे. पण नियमाप्रमाणे महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक बनू शकत नाही. फडणवीसांनी केवळ सरकार वाचवण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंनी महापौर बंगला हडपण्यासाठी हा करार केल्याचा आरोप राणेंनी केला आहे.

बाळासाहेबांचं स्मारक कायद्याच्या कचाट्यात!

दरम्यान, महापौर निवासस्थानातील बाळासाहेबांचं स्मारकर कायद्याच्या कचाट्यात सापडलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या 2013 च्या आदेशानुसार सरकारी निवासस्थाकांमध्ये स्मारकं उभारण्याची परवानगी दिली जाऊ नये,’ असा आदेश सर्वोच्च न्यायालायनं एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिले होते. या आदेशाला अनुसरून केंद्र सरकारनं 18 ऑक्टोबर 2014 रोजी एक परिपत्रक काढून सरकारी निवासस्थानं स्मारकात रुपांतर करण्यावर बंदी घातली होती. यामुळंच जनतेची इच्छा असतानाही माजी राष्ट्रपती दिवंगत अब्दुल कलाम यांचं निवासस्थान स्मारकात रुपांतरित करणं सरकारला शक्य झालं नाही. केंद्र सरकारचा हाच निर्णय आता बाळासाहेबांच्या स्मारकात अडथळा ठरणार आहे. त्यामुळे, महाराष्ट्र सरकार यातून नेमका कसा मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close