केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळणार घसघशीत पगारवाढ

November 20, 2015 12:46 PM0 commentsViews:

money_AP

20 नोव्हेंबर : सातव्या वेतन आयोगाने केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना गुरुवारी घसघशीत पगारवाढीची ‘गुड न्यूज’ दिली. आयोगाने आपला अहवाल सरकारला सादर केला. यात केंद्र सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतन आणि विविध भत्त्यांत भरघोस 23.55 टक्के वाढीची शिफारस केली आहे. तर निवृत्त कर्मचार्‍यांचीही विशेष दखल घेत त्यांच्या पेन्शनमध्ये 24 टक्के वाढीची शिफारस सुचवली आहे.

निवृत्त न्या. ए. के. माथूर यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने 900 पानांचा हा अहवाल अर्थमंत्री अरुण जेटली यांना सादर केला. यातील शिफारशी प्रथम मंजुरीसाठी कॅबिनेटमध्ये मांडल्या जातील आणि मंजुरीनंतर 1 जानेवारी 2016पासून त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. 47 लाख कर्मचारी आणि 52 लाख निवृत्त कर्मचार्‍यांना याचा फायदा मिळणार आहे. अर्थात, यामुळे सरकारी तिजोरीवर 1.02 लाख कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे.

या अहवालानुसार, सरकारी कर्मचार्‍यांचे दरमहा किमान मूळ वेतन 18 हजार रुपये, तर जास्तीत जास्त सव्वा दोन लाख रुपये होईल. कॅबिनेट सचिवांच्या वेतनातही घसघशीत वाढ सुचवण्यात आली असून, त्यांना दरमहा अडीच लाख रुपये वेतन मिळणार आहेत. सशस्त्र दलातील कर्मचार्‍यांसोबतच सरकारी कर्मचार्‍यांनाही ‘वन रँक वन पेन्शन’ (ओआरओपी) योजना लागू करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस या आयोगाने केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close