स्पेशल रिपोर्ट- आयसिसकडे वळू नये यासाठी मुस्लिम तरुणांसाठी जनजागृती मोहिम

November 22, 2015 5:07 PM0 commentsViews:

isis_indian muslimविवेक कुलकर्णी,मुंबई

२२ नोव्हेंबर – पॅरिसला झालेल्या अतिरेकी हल्लानंतर आयसिस या संघटनेच्या धोक्याबद्दल सगळ्या जगात चर्चा सुरू झाली आहे. भारतातलेच नाही तर अगदी महाराष्ट्रातले काही युवकही आयसिसकडे वळाले असल्याची प्रकरणही घडली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातल्या काही मुस्लिम वकिलांनी मुस्लिम युवकांनी आयसिसकडे वळू नये याकरता जनजागृती मोहिम सुरू केलीयं.

आयसिस…जगातील सगळ्यात ताकदवान आणि श्रीमंत अतिरेकी संघटना…इराक आणि सीरियाच्या सीमाभागात पसरलेल्या या संघटनेच्या अतिरेकी कृत्यांची झळ आता सगळ्या जगाला जाणवू लागली आहे. भारतालाही या प्रकाराची झळ पोहोचू लागली आहे. भारतातही अनेक युवक इंटरनेटवर आयसिसशी संबंधित माहिती शोधत आहेत किंवा त्याचा प्रचारतरी करत असल्यानं संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

हा मूलतत्ववादी प्रसार रोखण्यासाठी आता राज्यातले मुस्लिम वकील आता सरसावले आहेत. मुस्लिम विद्यार्थी आणि युवकांमध्ये आयसिसच्या धोक्याबद्दल जनजागृती करण्याचं काम महाराष्ट्र लॉ सोसायटी ही स्वयंसेवी संस्था करणार आहेत. राज्यातल्या जिल्हा आणि तालुका पातळीवर या संस्थेशी संबंधित स्थानिक वकील मुस्लीम युवकांशी संवाद साधून आयसिसच्या जाळ्यात न सापडण्यासाठी जनजागृती करणार आहेत.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि मराठवाडा या भागांमध्ये आयसिसचा प्रभाव पाहायला मिळतोय असं या संस्थेचं म्हणणं आहे. मूलतत्ववादी विचारसरणीचा प्रसार होण्यासाठी मुस्लिम युवकांमध्ये समाजाच्या मुख्य प्रवाहात नसल्याची भावना, घरात असणारं कट्टर धार्मिक वातावरण, राजकीय नेत्यांची धार्मिक तेढ वाढविणारी वक्तव्यं तसंच मदरशांमधून मिळणारं शिक्षण कारणीभूत असल्याचं या संस्थेला वाटतं.

जे तरुण मूलतत्वादाकडे झुकत आहे अशांना वेळीच सावध करुन पुढचे, त्यांच्याशी संवाद साधणं हाच मार्ग असं या संस्थेला वाटतं. प्रत्येक अतिरेकी घटनेनंतर मुस्लिम समाजाकडे संशयानं बघितल्या जातं त्यानं समाजातली दरी वाढतच जाते. मुस्लिमांकडे संशयानं पाहिल्यानं प्रश्न सुटणार नाहीये तर गरज आहे त्यांना सोबत घेऊन जनजागृती करण्याची.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close