‘ते’ कैदी पार्टीत शिरा गरम करुन खात होते,प्रशासनाचा दावा

November 25, 2015 7:39 PM0 commentsViews:

KOL TURUNG party25 नोव्हेंबर : कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृहामध्ये झालेल्या कैद्यांच्या पार्टीप्रकरणी 5 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 2 अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे, तर 3 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलंय. एवढंच नाहीतर पार्टीमध्ये कैद्यांनी दारू, मटण आणि गांजा सेवन केला नव्हता, तर कैद्यांना दिला जाणारा शिरा त्यांनी गरम करून खाल्ल्याचं सांगण्यात आलंय.

जेलमध्ये दारुपार्टी प्रकरणी पश्चिम महाराष्ट्राच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी आज धडक कारवाई केलीय. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आहे. जेलच्या मोकळ्या जागेतच हा प्रकार घडल्यानं जेलचे अधीक्षक सुधीर केंगरे यांची आणि जेलर उत्तरेश्वर गायकवाड या 2 दोन्ही अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे. तर युवराज कांबळे, मनोज जाधव, विजय टिपुगडे या 3 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलंय. विशेष म्हणजे चित्रफीतीमध्ये दिसणारे सगळे कैदी हे पुणे आणि मुंबईचे असून विविध गुन्ह्यांमध्ये त्यांना शिक्षा झालीय. या कैद्यांवरही योग्य वेळी कारवाई करण्यात येईल अंस सांगत साठे यांनी वेळ आली तर गुन्हाही दाखल करणार असल्याचं सांगितलंय. तसंच या प्रकरणी कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असंही स्वाती साठे यांनी सांगितलंय. त्यामुळं आता कळंबा जेलमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यात प्रशासनाला आता तरी यश येतं का हे पहावं लागणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close