आणीबाणी लादणार्‍यांनी असहिष्णुतेवर बोलू नये, जेटलींचा पलटवार

November 27, 2015 3:10 PM0 commentsViews:

jetli on sonia27 नोव्हेंबर : ज्यांचं राज्यघटना निर्मितीमध्ये योगदान नाही अशी लोकं राज्यघटनेवर चर्चा करताय अशी घणाघाती टीका करणार्‍या सोनिया गांधींना आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी प्रत्युत्तर दिलं. देशावर आणीबाणी लादणार्‍यांनी राज्यघटनेवर बोलू नये असे खडेबोल जेटलींनी सुनावले.

काल गुरुवारी देशभरात संविधान दिन साजरा झाला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संविधान दिनाने सुरुवात झाली. यावेळी सोनिया गांधींनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. ज्यांचं राज्यघटना निर्मितीमध्ये योगदान नाही, ज्यांना राज्यघटनेबद्दल आस्था नाही अशी लोकं राज्यघटनेवर चर्चा करताय, हेच मुळात हास्यास्पद आहे अशी टीका सोनिया गांधींनी केली होती. आज अरुण जेटलींनी आपल्या निवेदनात काँग्रेसवर हल्लाबोल केला. 70 च्या दशकात घटनेत आणीबाणीच्या काळात नागरिकांचा मुलभूत अधिकार स्थगित ठेवण्याचे अधिकार होते, त्याचा गैरवापर झाला आणि आणीबाणी लादली गेली. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीचं सरकार केंद्रात आल्यावर ते कलम वगळण्यात आलं. त्यावेळी नागरिकांना बोलण्याचंही स्वातंत्र नव्हतं हे असहिष्णुतेवर बोलणार्‍यांनी लक्षात ठेवावं असा टोलाही जेटली यांनी काँग्रेसला लगावला.

तर दुसरीकडे, 26 नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून साजरा करण्याबाबत आज गुलाम नबी आझाद बोलत होते, आणि त्यांना मध्येच रविशंकर प्रसाद यांनी सोम्यपणे टोकलं. रवीशंकर प्रसाद आणि गुलाब नबी आझाद यांच्या या जुगलबंदीनंतर अरूण जेटलींनीही या वादाला वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवलं. सरकार यावर्षी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 125 जयंती साजरी करत असताना काँग्रेसच्या पोटात का दुखतंय, असा टोमणा अरूण जेटलींनी लगावला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close