आता सरकारमध्ये ‘तुम्ही-आम्ही’

February 11, 2010 2:20 PM0 commentsViews: 5

11 फेब्रुवारीशाहरुख खानला विरोध करण्यावरून दोन सेनांमध्ये 'तुमचा अमिताभ आमचा शाहरुख' असे नाट्य रंगले. आता याच नाटकाचा दुसरा अंक दोन्ही सत्ताधारी काँग्रेसमध्ये पाहायला मिळू लागला आहे. कुणाही राजकीय व्यक्तीचे संरक्षण काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांचे संरक्षण कायम राहणार हे नक्की झाले आहे. शाहरुखच्या विरोधासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली. या नेत्यांना जमिनीवर आणण्यासाठी त्यांचे पोलीस संरक्षण काढण्याचे धाडस सरकारने दाखवले. तर सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंचेही संरक्षण काढण्याचा थेट इशारा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला. सेनेनेही संरक्षण परत करून या इशार्‍याचे चांगलेच राजकारण करून घेतले. पण यानिमित्ताने कारवाईचे धाडस दाखवणार्‍या काँग्रेसचे पारडे जड दिसू लागले. पूर्णपणे संरक्षण देऊन कोणत्याही परिस्थितीत सिनेमा रिलीज करू, असे आश्वासन सरकारने थिएटर मालकांना दिले. पण सेनेच्या राड्याने धास्तावलेल्या थिएटर मालकांनी अखेर शुक्रवारी हा सिनेमा रिलीज न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे सरकार पुन्हा एकदा जमिनीवर आले. बहुदा हाच मोका साधून आपल्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करणार्‍या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हा टोला दिल्याचे मानले जात आहे. शिवाय नुकत्याच झालेल्या पवार-ठाकरे भेटीवर तोंडसुख घेणार्‍या काँग्रेसचे यानिमित्ताने राष्ट्रवादीने उट्टे काढल्याचीही चर्चा कार्यकर्ते करत आहेत.

close