विवाहितेचा अमानुष छळ, खायला शेण आणि गोमूत्र

December 1, 2015 5:06 PM0 commentsViews:

01 डिसेंबर : चारित्र्यावर संशय घेऊन अमानुषतेचा किती कळस गाठू शकतो, याची प्रचीती काल (सोमवारी) औरंगाबादेतील मिसारवाडीत आली. एका 19 वर्षाच्या विवाहितेवर अमानुष अत्याचार करून तिला चक्क डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दिवसरात्र घरकामासाठी जनावरासारखे राबवून घ्यायचे आणि काम संपताच बाथरूममध्ये डांबायचे… एवढच नाही तर जेवणात खाण्यासाठी तिला चक्क गाईचं शेण आणि पिण्यासाठी पाण्याऐवजी गोमूत्र द्यायचे… गेल्या सहा महिन्यांपासून या नवविवाहितेवर हा अमानुष अत्याचार सुरू होता. अखेर सोमवारी शेजार्‍यांनी सिडको पोलिसांच्या मदतीने या विवाहितेची सुटका केली.

sarita 1231

सारिका अग्रवाल या महिलेचे औरंगाबादेतील संजय अग्रवाल यांच्याशी लग्न झाले. मात्र लग्नानंतर सारिकाला सासरच्या मंडळींनी त्रास देण्यास सुरुवात केली. तिच्याकडून दिवसरात्र जनावरासारखे काम करुन घेण्यात येत होते. तर तिला काम केल्यानंतर घरातील बाथरुममध्ये कोंडून ठेवण्यात येत असल्याचे पीडित महिलेने सांगितले. एवढेच नव्हे तर तिला जेवण म्हणून गाईचे शेण आणि पाणी म्हणून गोमूत्र देण्यात येत असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पीडित महिलेने दिलेल्या माहितीत आणखी धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

“माझा पती मला उलटे लटकवून बुट घालून मारायचा, अंगावर कुत्रे सोडायचा आणि त्यावेळी माझी ननंद आणि माझी सासू मला बघून हसायची, अजून मार असं त्याला सांगायची, असंही या पडीत विवाहीतेने सांगितलं आहेत. या प्रकरणाची माहिती पीडित महिलेच्या नोतेवाईकांना आणि पोलिसांना मिळताच त्यांनी या महिलेची सुटका केली आहे. सारिकाचा नवरा संजय हा केटरींगचा व्यवसाय करतो. सारिकाच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यानं तिला बाथरूम मध्ये कोंडून ठेवलं होतं.

दरम्यान, सारिकाला गेल्या सहा महिन्यांपासून पोटात अन्नाचा कणही नसल्याने तिची प्रकृती नाजून झाली असून तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शवली होती. मात्र अखेर नागरिकांच्या आणि नातेवाईकांच्या दबावामुळे पीडित महिलेच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close