महिलांना मंदिरात प्रवेश न देणे यात अपमान नाही -पंकजा मुंडे

December 3, 2015 5:59 PM0 commentsViews:

pankaja munde pc03 डिसेंबर : शनि-शिंगणापूरमध्ये महिला दर्शनासंदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या वादग्रस्त विधानावरून खळबळ उडाली आहे. महिलांनी चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेणं हा महत्वाचा विषय वाटत नसल्याचं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय. तसंच मंदिरात जाण्यास महिलांना बंदी, यामध्ये महिलांचा अपमान होतो असं मला वाटत नाही. माझ्या जन्माच्या आधीपासून ही प्रथा सुरू आहे असंही विधान पंकजांनी केलंय. त्यामुळे या प्रथेला पंकजांनी थेट पाठिंबा दर्शवलाय आणि महिलांना दर्शन घेण्यास विरोध केलाय.

मागील शनिवारी प्रसिद्ध शनि-शिंगणापूरमध्ये शनीमंदिराचा चौथर्‍यावर चढून एका महिलेनं शनीदेवाचं दर्शन घेतलं होतं. शनीमंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही. पण, पहिल्यांदाच एका महिलेनं चौथर्‍यावर चढून शनीचं दर्शन घेतल्यामुळे एकच वाद निर्माण झाला. या प्रकरणी मंदिर समितीने सात जणांना निलंबित केलं. एवढंच नाहीतर शनीदेवाचा दुधाने अभिषेकही केला.

या प्रकरणी पंकजा मुंडेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता पंकजांनी या विषयाला फारस महत्त्व देण्याची गरज नाही. मुळात हा विषय महत्वाचा नाही असं वक्तव्य केलं. शनीमंदिर असो अथवा हनुमान मंदिर असो तिथे महिलांना प्रवेश दिला जात नाही. ही पौराणिक असून अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. त्यामुळे महिलांना प्रवेश दिला जात नाही यात महिलांचा अपमान होतो असं काही नाही असं मत पंकजांनी मांडलं.

तसंच त्या महिलेनं दर्शन घेतल्यानंतर मंदिर समितीने अभिषेक केला त्या घटनेचं मी समर्थन करत नाही असंही पंकजांनी स्पष्ट केलं. जर महिलाना शिक्षण घेऊ दिलं नाही, घरात डांबून ठेवलं जातं, चूल-मुल सांभाळ अशीच मानसिकता असेल तर त्याला माझा कडाडून विरोध आहे आणि अशा गोष्टींना विरोध झालाच पाहिजे असंही पंकजांनी ठणकावून सांगितलं.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close