दुष्काळाचा बळी, लग्न खर्चाच्या चिंतेनं तरुणीची आत्महत्या

December 5, 2015 8:22 PM0 commentsViews:

hingoli laxmi05 डिसेंबर : दुष्काळामुळे शेतकरी निराश होऊन आत्महत्या करतायेत. पण दुसरीकडे त्यांची मुलंही आयुष्य संपवत आहे. आधीच नापिकी, दुष्काळ आणि त्यात आपल्या लग्नाचा खर्च आईला कसा झेपेल या काळजीनं हिंगोली जिल्ह्यात एका तरुण मुलीनं आत्महत्या केलीये.  हिंगोलीतल्या आडगाव मुटकुळे या गावातल्या लक्ष्मी खोरणे या तरुणीनं शेततळ्यात उडी मारून जीव दिलाय.

लक्ष्मी धोंडबा खोरणे हिचे वडील शेतकरी होते. त्यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. लक्ष्मी पेक्षा 3 मोठ्या बहिणी तिघींचे लग्न करून
लक्ष्मीची आई अभयीबाई थकली. घरी दोन एकर शेती असून, लक्ष्मीचा भाऊ समाधान वसमत तालुक्यात एका शेतावर सालगडी म्हणून कामाला गेला आहे. लहान भाऊ लक्ष्मी सोबतच शेतात मजुरी साठी जातो. दुष्काळामुळे दोन एकर शेतातून यंदा लागवडीचा खर्च निघाला नाही. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. पहिलेच तीन बहिणीचे लग्न करून अडचणीत सापडलेली आई या स्थितीत आई आपला विवाह कसा करेल, याची चिंता लक्ष्मीला भेडसावत होती.

मागील काही दिवसापासून पाहुणे लक्ष्मीला पाहायला येत होते,सुंदर असणारी लक्ष्मी एका नजरेत पाहुण्यांना पसंत यायची, पण हुंडा देण्यासाठी काहीही नसल्याने पाहुणे लग्नास नकार द्यायचे .छोट्याशा झोपडीत संसार चालवणार्‍या लक्ष्मीच्या आई कडे हुंड्यात देण्यासाठी छदाम ही नव्हते. होती तर फक्त सुंदर,मेहनती,समजूतदार लक्ष्मी. मात्र मुला कडच्या मंडळींना लक्ष्मी सोबतच ‘लक्ष्मी’ सुद्धा हवी होती.

त्यात यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे नापिकी झाली,जेम तेम असलेल्या 2 एकर शेतीवर जे थोडेफार उत्पन्न व्हायचे ते ही झाले नाही. परिसरात शेतात पिक नसल्यामुळे रोज मजुरी भेटत नव्हती. अशा परिस्थितीत दोन वेळ जेवायला भेटणार की नाही असा प्रश्न पडायचा अशा परिस्थितीत आई लग्न कसं करणार,माझ्या लग्नाची चिंता आई ला लागली असा विचार लक्ष्मीला आला आणि त्यातून आज दुपारच्या सुमारास तिने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली. शौचास जाते अस म्हणत गेलेली लक्ष्मी घरी परत आली नसल्याने तिची शोधाशोध सुरू झाली. तळ्याजवळ तिची चप्पल दिसली,पाण्यात शोध घेतला असता तिचा मृतदेह आढळला. दुष्काळाच्या थेट झळा आता शेतकर्‍यांसोबत त्यांच्या मुलांना ही बसत असून शासनाने लवकरात लवकर यावर उपाय करणे गरजेचे आहे.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close