…तर विधान परिषदेसाठी निर्णय घेईन -राणे

December 5, 2015 9:41 PM0 commentsViews:

05 डिसेंबर : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे नेते नारायण राणे लढणार की नाही अशी चर्चा सुरू झालीये. पण आता खुद्द राणेंनी निवडणुकीबद्दल सोडलं मौन सोडलंय. मी स्वतःहून तिकीट मागणार नाही. पक्षाकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली नाही. जर इच्छा व्यक्त करायची असल्यास सोनिया गांधींकडे करेन. पण, पक्षाने विचारलं तर विचार करेन असे संकेत नारायण राणेंनी दिले. आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत राणेंनी सडतोड भूमिका मांडत पक्षावरही टीकास्त्र सोडले. अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचं नुकसान होतंय अशी टीकाच राणेंनी केली.rane on vidhan parishad

नारायण राणे म्हणतात, सोनिया गांधींना भेटलो ते बिहार निवडणुकीत मिळालेल्या विजयासाठी अभिनंदन करण्यासाठी त्यात विधानपरिषदेसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. पण मी निघताना सोनियांनी विचारलं तेव्हा काँग्रेसमधले ज्येष्ठ आणि काम करणार्‍यांना उमेदवारी द्यावी असं म्हटलं. मी कधीच यापूर्वी तिकीट मागितलं नाही आणि यापुढे मागण्याचा प्रश्नच नाही. बांद्राची निवडणूक मला लढवायची नव्हती. अशोक चव्हाणांनी मला सोनिया गांधींचं नाव सांगितलं म्हणून मी फॉर्म भरला असा खुलासा राणेंनी केला.

ते पुढे म्हणाले, आता ज्या बातम्या येतायेत ते आमचेच लोकं देतायेत. अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसच नुकसान होत आहे अशी टीकाही राणेंनी केली. तसंच युतीचं सरकार अपयशी आहे. पण त्याचा फायदा घ्यायला विरोधी पक्ष तयार आहे का? सक्षम आहे का? जर विरोधी पक्षाचा अंकुश असता तर हे सरकार जी चुकीची कामं करतंय ती झाली असती का? याचा विचार पक्षाने केला पाहिजे. निवडणुकीसाठी अर्ज कसले मागवता. पक्षाकडे जर सक्षम लोक असतील तर ते विधिमंडळात पाठवले गेले पाहिजेत. फक्त गट तयार करून त्यातली नावं पुढे करायची अशाने पक्ष मजबूत होत नाही असा सल्लावजा टोलाही राणेंनी लगावला.

मला संधी द्यावी असं मी म्हणत नाही. मी माझ्या कामावर समाधानी आहे. त्यासाठी मला विधिमंडळातच जायची गरज नाही. मी इच्छा व्यक्त करणं हा माझा स्वभाव नाही. जर इच्छा व्यक्त करायची असती तर सोनिया गांधींकडे केली असती. पक्षाने विचारलं तर विचार करेन. विचारलं तर बघू. जेव्हा पक्ष विचारेल तेव्हा निर्णय घेईन असंही राणेंनी स्पष्ट केलं.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close