महाराष्ट्राची अखंडता हा ‘बंदा’ रुपया, सेनेनं फटकारलं

December 9, 2015 11:39 AM0 commentsViews:

sena on aane09 डिसेंबर : विदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं सामनातून मुख्यमंत्री आणि भाजपवर घणाघाती हल्ला चढवलाय. महाराष्ट्राचा इतिहास आणि हिंमत विसरलेल्यांच्या हाती राज्याची सूत्रे गेलीये अशी टीका शिवसेनेनं ‘सामना’तून केलीये. तसंच महाराष्ट्राची अखंडता ही बंदा रुपया आहे असं सांगत सेनेनं भाजप आणि श्रीहरी अणेंना फटकारलंय.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना आणि भाजप विदर्भाच्या मुद्यावरुन आमनेसामने आली होती. आज सेनेनं आपल्या मुखपत्र सामनातून ‘महाराष्ट्र हा ‘बंदा’ रुपया’ या शिर्षकाखाली अग्रलेखात समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्र राज्य तोडण्याची भाषा सुरू झाली आहे आणि अशा तोडफोड प्रवृत्तीच्या मागे उभे राहण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे. ऍडव्होकेट जनरल पदावरील सन्माननीय व्यक्तीच राज्याच्या विरोधात भूमिका घेते आणि भाजपचे मुख्यमंत्री, मंत्री वगैरे त्या व्यक्तीचे पाठीराखे बनून टाळ्या वाजवतात, हा खेळ सुरू आहे. म्हणजे एखाद्या खुन्याची पाठ मुख्य न्यायाधीशाने जाहीरपणे थोपटण्यासारखाच हा प्रकार आहे अशा शेलक्या शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आलीये.

तसंच श्रीहरी अणे हे सरकारी चाकर आहेत आणि सरकारच्या वतीनं पगार घेऊन सरकारची बाजू मांडणे हे त्यांचे काम आहे. हे शिक्षणमंत्री तावडे यांना समजू नये? महाराष्ट्राचा इतिहास आणि हिंमत विसरलेल्यांच्या हाती राज्याची सूत्रे आहेत. महाराष्ट्राची अखंडता हा बंदा रुपया आहे. ‘अणे’वाल्यांनी हे लक्षात घ्यावे असं टोलाही सेनेनं लगावलाय.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close