विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला बंडखोरीचा फटका

December 9, 2015 6:21 PM0 commentsViews:

vidhan sabha 1

09 डिसेंबर : विधानपरिषद निवडणुकीचं वातावरण आता तापायला लागलं आहे. राज्याच्या विधान परिषदेच्या 8 जागांसाठी येत्या 27 डिसेंबरला मतदान होत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज (बुधवारी) अंतिम मुदत होती. येत्या 12 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर प्रत्येक मतदारसंघातून कोणाकोणामध्ये लढत होईल, याचे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, यामध्ये मुंबईसह कोल्हापूर आणि अहमदनगरमधून आघाडीला बंडखोरीचा फटका बसला आहे.

मुंबईतील बंडखोर उमेदवार प्रसाद लाड यांनी विधानपरिषद निवडणपकीसाठी आपला अर्ज भरला आहे. माझा उमेदवारी अर्ज दाखल करणं ही बंडखोरी नसून मी पक्षाचा राजीनामा देऊन हा अर्ज भरला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच 10 अपक्ष नगरसेवकांचा मला पाठिंबा आहेत आणि अजून काही नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत, असं लाड यांनी म्हटलं आहे. तर कोल्हापूरमध्ये विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. महादेव महाडिक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. सतेज पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिल्याने नाराज झाल्यानं महादेव महाडिक यांनी अर्ज भरला आहे. पक्षाची नाराजी का आहे ते मला माहिती नाही, पण मी चवथ्यांदा विजयी होईन असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला आहे. अहमदनगर विधान परिषदसाठीही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी अर्ज भरला. काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी असताना काँग्रेसमधून बंडखोरी झाली आहे. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्याचे ससाणे जिल्हाध्यक्ष आहेत. ससाणे यांना श्रेष्ठींचं पाठबळ असल्याचं बोललं जातंय. ससाणे काँग्रेसचे माजी आमदार आणि साई संस्थानचे माजी अध्यक्ष आहेत. ते गेल्या निवडणुकीत आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार होते. यंदा पुन्हा ससाणे आणि जगताप यांच्यात लढत होणार आहे.

दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजप शिवसेना यांनी युती केली असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही आघाडी केली आहे. भाजप 5 आणि शिवसेना 3 जागा लढणार आहे. तर काँग्रेस 4 जागा आणि राष्ट्रवादी 3 जागा लढवणार आहे. या निवडणुकीसाठी 26 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 30 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close