दुष्काळी पालवी, दुष्काळग्रस्तांचा मुलांना मिळालं मायेचं छत !

December 10, 2015 11:40 AM0 commentsViews:

वैभव सोनवणे,पुणे

10 डिसेंबर : मराठवाड्यातल्या दुष्काळात होरपळणार्‍या विद्यार्थ्यांना हक्काची सावली मिळवून दिलीय पुण्यातल्या भारतीय जैन संघटनेनं…मराठवाड्यातल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातली दोनशे मुलं आणि मुली या संघटनेनं त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुण्यात आणली आहेत. इथं आल्यानंतर या मुलांचा आत्मविश्वास चकित करणारा आहे. कशी फुलतेय पुण्यात मराठवाड्यातल्या दुष्काळाची ही पालवी, याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट..

jain_pune_pkgमराठवाड्यातल्या भीषण दुष्काळाची दाहकता सगळेजण पाहताहेत…उन्हातान्हात थेंबभर पाण्यासाठी होणारी लहानग्यांची वणवण देखील जीवाला चटका लावणारी…त्यातच घरातली कुणीतरी आत्महत्या केली, एका रात्रीतून अचानक पोरका होणारा सगळा भविष्यकाळ अशी विदारक स्थिती…पण अशा परिस्थितीत त्यांना भक्कम आधार देण्याचं काम केलंय पुण्यातल्या भारतीय जैन संघटनेनं…आत्महत्याग्रस्त कुटुंबामधली दोनशे मुलं दत्तक घेऊन त्यांना पंधरादिवसांपूर्वीच पुण्यात आणण्यात आलंय. पुण्याच्या झगमगाटाच्या वातावरणाला ही मुलं आता चांगलीच सरावली आहेत. अगदी तिसरीत शिकणारा आणि वडील गेल्यामुळे पुण्यात आलेला उमेश पुन्हा गावी जायला फारसा उत्सुक नाही.

परिस्थिती आपल्याला जगायला शिकवते, त्यातही संघर्षाच्या जाणीवा अधिक तीव्र करते. अशावेळीही झेपावणारी प्रतिभा काही दबून राहत नाही. आणि त्यामुळंच दुष्काळाचा काळोख दूर करण्यासाठी थेट काळजाला हात घालणारेच प्रश्न कवितेतून उभे राहतात.

मराठवाड्यात प्यायला पाणी नसलेल्या गावात 9 वीत शिकणारी मुलगी…मांडीवर डोकं ठेऊन बापाला जीव सोडताना बघणार्‍या या पोरीच्या शिकण्याच्या इच्छेची आणि ते नाकारणार्‍या व्यवस्थेविरोधात लढण्याच्या तिच्या धैर्याची तुलनाच होऊ शकत नाही. दुष्काळात
फुलणारी हीच खरी पालवी आहे.

पंधरा एकराची कोरडवाहू शेती आणि आत्महत्या करुन मेलेला बाप….घरी आई एकटी असतानाही मोठा होऊन बापाचं नाव काढण्याच्या इर्षेनं पुण्यात शिकायला आलेला अभिषेक…चांगल्या वातावरणात उदो उदो करणार्‍या पालकांना हेवा वाटावा अशी हुशारी घेऊन ही मुलं पुण्यात आली आहेत.

या दुष्काळातल्या पालवीवर कोरड्या भविष्याचं घोंगावणारं संकट भारतीय जैन संघटनेनं दूर केलंय. यासारखी आणखी शंभर मुलं दत्तक घेण्याचा त्यांचा मानस आहे. या संघटनेसारखंच तुम्ही आम्ही सगळ्यांनी दुष्काळात फुलणारी ही पालवी सांभाळायला हवी, इतकंच नाही तर ती मोठीही करायला हवी…

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close