‘आई-बाबा आमच्याशी तरी बोला, फेसबुक-व्हॉट्स अॅप टाळा’

December 10, 2015 12:33 PM0 commentsViews:

अनिल तळगुळकर, कोल्हापूर

10 डिसेंबर : आजकाल सोशल मीडियाच्या वापरात पालक इतक गुंतलेत की, त्यांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळच नाही. त्यामुळे पालक आणि मुलांच्या मधील संवादच हरवत चाललाय. यासाठीच ‘पालकांनो,आमच्यासाठी वेळ द्या’ अशी आर्तहाक कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मधील सुरुते इथल्या मराठी शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एका आगळ्या वेगळ्या प्रभात फेरीच्या माध्यमातून दिलीय.chandgad andolan

नको फेसबुक…नको व्हॉट्स अॅप…हा हट्ट आहे या लहानग्यांचा त्यांच्या पालकांकडे…व्हॉट्स अॅप, फेसबुकवर सतत बिझी असणार्‍या
पालकांकडून त्यांना हवाय थोडासा वेळ…हल्ली सोशल मीडियाचं लोण आता शहराकडून खेड्यापर्यंत येऊन पोहोचलंय. या मीडियामध्ये मुलांचे पालक इतके गुंतलेत की, त्यांना आपल्या मुलांपेक्षाही फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील मित्र मैत्रीणी जास्त जवळच्या वाटू लागल्यात. साहजिकच पालकांचं मुलांशी बोलणं कमी झालंय..आणि मुलांना तर आई-बाबांशी बोलायचं…म्हणूनच हे बोर्ड हातात घेऊन या चिमुकल्यांनी अशी फेरीच काढली.

शाळेत मुलांशी बोलताना अनेकजण आम्हाला पालक वेळच देत नाहीत,अशी बहुतेकांची तक्रार असल्याचं शिक्षकांच्या लक्षात आले. याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर आणि मनावरही होत असल्याचं समजल्यानंतर शिक्षकांनी ही शक्कल लढवली आणि मुलांचा हट्ट पालकांपर्यंत पोहोचवला.

सोशल मीडियामुळे जग जवळ आलंय हे खरं..पण त्यामुळे आपल्या जवळ असलेलं हे निरागस जग लांब जाऊ नये इतकंच…त्यासाठीच मुलांनी केलेला हा प्रयत्न पालकांपर्यंत पोहोचला तरी पुरे..

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close