सलमानची निर्दोष मुक्तता, सर्व आरोपांमधून सुटका

December 10, 2015 6:14 PM0 commentsViews:

salman salamat10 डिसेंबर : फुटपाथ अपघात प्रकरणी अभिनेता सलमान खान अखेर सुटलाय. मुंबई उच्च न्यायालयाने पुरेशा पुराव्याअभावी सलमानची निर्दोष मुक्तता केलीये. सलमानविरोधात सबळ पुरावे नसल्यामुळे सर्व आरोपांमधून सुटका करण्यात आलीये. संशयाच्या आधारे सलमानला दोषी धरता येणार नाही असं स्पष्ट मत नोंदवत उच्च न्यायालयाने सलमानला मोठा दिलासा दिलाय. तसंच उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांवर कडक ताशेरेही ओढले. सत्र न्यायालयात खटला नीट चालला नाही. मीडिया आणि लोकांच्या दबावाखाली काम करणं टाळायला हवं होतं असं परखड मतही न्यायालयाने नोंदवलं.

28 सप्टेंबर 2002 साली सलमान खानने बेदरकारपणे गाडी चालवत वांद्र्यात फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडलं होतंय. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. गेल्या 13 वर्षांपासून या प्रकरणाचा खटला सुरू होता. 6 मे 2015 रोजी मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला या प्रकरणात दोषी ठरवत 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. पण, सलमानने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने सलमानला दिलासा देत शिक्षेवर स्थगिती आणली. सात महिन्यानंतर आज या खटल्यावर अंतिम सुनावणी झाली.

सलमानने मद्य प्राशन केलं याचा कोणताही पुरावा सिद्ध करता आला नाही. संशयावरुन सलमानला दोषी ठरवलं जाऊ शकत नाही. आरोप सिद्ध करण्यात सरकारी वकील कमी पडले असे ताशेरे ओढत उच्च न्यायालयाने सलमानला निर्दोष ठरवत सर्व आरोपांतून सुटका केली. तसंच पोलिसांनी तपास योग्य पद्धतीने केला नसून अजूनही पुरावे गोळा करत आहे. त्यामुळे सलमानला दोषी ठरवताय येत नाही असं मत उच्च न्यायालयाने नोंदवलं.

तसंच मुख्य साक्षीदार रवींद्र पाटीलच्या जबाबावर उच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले. रवींद्र पाटील यांचा जबाब हा मजिस्ट्रेटसमोर नोंदवण्यात आला. पण, जेव्हा सत्र न्यायालयात याची सुनावणी सुरू होती तेव्हा पाटील गैरहजर राहिले. त्यानंतर त्यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आलं. त्यांचा मृत्यू झाला याबद्दल पोलिसांनाही माहिती नव्हतं. ज्या दिवशी घटना घडली त्यावेळी गाडीत कमाल खान सुद्धा हजर होता. त्याला न्यायालयात हजर करता आले नाही. जर त्याला हजर केले असते तर पाटीलच्या साक्षीवर शिक्कामोर्तब झालं असतं. पण,कमाल खानला हजर करण्यात सरकारी पक्षाने प्रयत्न का केला नाही असे ताशेरेही उच्च न्यायालयाने ओढले. तर दुसरीकडे, हा निकाल धक्कादायक आहे. या निकालविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असं ज्येष्ठ वकील सतीश माने शिंदे यांनी IBN लोकमतशी बोलतांना स्पष्ट केलं. परंतु, आपला लाडका अभिनेता निर्दोष सुटल्यामुळे चाहत्यांनी एकच जल्लोष सुरू केलाय. सलमानच्या घराबाहेर चाहत्यांनी एकच गर्दी केलीये.

फुटपाथ अपघात प्रकरणाचा घटनाक्रम

– 28 सप्टेंबर 2002च्या रात्री वांद्रे परिसरात सलमानच्या गाडीनं फुटपाथवरील 5 जणांना चिरडलं
– अपघातात एकाचा मृत्यू
– सलमानवर मद्यपान करून गाडी चालवल्याचा आरोप
– गेल्या 13 वर्षांपासून हा खटला सुरू
– खटल्यात आतापर्यंत 800 जणांच्या साक्षी नोंदवल्या
– अपघातावेळी सलमान खान गाडी चालवत असल्याचा आरोप
– प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सलमानला ओळखलं
– 2012 मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
– गेल्या 3 वर्षांमध्ये 28 साक्षीदारांची उलटतपासणी
– सलमानच्या ड्रायव्हरमुळे खटल्याला कलाटणी
– अपघातावेळी गाडी आपण चालवत होतो
– सलमानचा ड्रायव्हर अशोक सिंहचा कोर्टात दावा
– सलमाननं स्वत:वरील सर्व आरोप फेटाळले
– सरकारी पक्षानं सलमानचा दावा फेटाळला
– न्यायालयाने निकालाची तारीख 6 मे निश्चित केली

– न्यायालयाने निकाल सुनावला, सलमान दोषी. सायंकाळी हायकोर्टाकडून दोन दिवसांचा जामीन

– 10 डिसेंबर 2015 रोजी उच्च न्यायालयाने पुराव्याअभावी सलमानची निर्दोष मुक्तता केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close