राज्यातल्या काही साखर कारखान्यांनी थकवले शेतकर्‍यांचे 1800 कोटी रुपये

December 10, 2015 3:07 PM0 commentsViews:

वैभव सोनवणे, पुणे

10 डिसेंबर : राज्यातल्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे जवळपास साडे अठराशे कोटी रुपये थकवले आहेत. हायकोर्टाचे आदेश असूनही कारखानदार पैसे देण्यास टाळाटाळ करताहेत. त्यामुळं साखर आयुक्त आणि सरकारच्या विरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका स्वाभिमानी शेतकरी संघटना दाखल करणार आहे. तर दुसरीकडे साखर कामगारांनीही कारखानदारांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

sugarcane farmenr231

एफआरपीच्या मुद्यावरुन सध्या जोरदार वाद रंगतोय. त्याच गेल्या हंगामातील 670 कोटी रुपये साखर कारखानदारांनी थकवले आहेत. साखरेचे दर पडल्याचं कारण देत कारखानदार पैसे देण्यास टाळाटाळ करताहेत. चालू हंगामातील थकबाकी 1255 कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. कोर्टाचे आदेश असतानाही पैसे दिले जात नाहीत, म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोर्टात धाव घेतलीय. तर येत्या 13 डिसेंबरला चक्का जाम आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

आता आपण नजर टाकुयात एफआरपीची रक्कम न देणारे कोणते कारखाने आहेत आणि त्यांचे नेते कोण आहेत.

  • एफआरपी न देणारे कारखाने
    1. भाजपचे नेते बबनराव पाचपुतेंचा साईकृपा कारखाना, श्रीगोंदा
    2. साखर संघाचे माजी अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील यांचा विजय शुगर
    3. अशोक चव्हाण यांचा नांदेडचा भाऊराव सहकारी साखर कारखाना

यापैकी काही कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे, तर काहींच्या संदर्भात सुनावणी सुरू आहे. कारखानदारांच्या विरोधातला रोष फक्त शेतकर्‍यांमध्ये नाही, तर साखर कारखान्यात काम करणार्‍या कामगारांमध्येही आहे. कामगारांच्या मोबदल्यात अपेक्षित वाढ मिळत नाही, त्यामुळं त्यांनी 2 जानेवारीपासून बेमुदत संपाचा इशारा दिलाय.

राज्यातल्या साखर उद्योगाला आधीच घरघर लागली आहे. चुकीच्या राजकीय व्यवस्थापनामुळं अनेक कारखाने अवसायानात निघाले आहेत. आता सहकाराला संजीवनी देण्यासाठी सरकारी इच्छाशक्तीची गरज आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close