राजकारणाचा पवारांना अचूक अंदाज – मोदी

December 10, 2015 9:11 PM0 commentsViews:

narendra Modi on pawar1210 डिसेंबर : शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज चांगला येतो. शरद पवारांनी याचा राजकारणात चांगला वापर केला असून राजकारण समजून घ्यायचं असेल तर शरद पवारांसोबत बसा, अशा मिश्कील शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना दाद दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पंच्याहत्तरी निमत्त दिल्लीमध्ये त्यांचा अमृत महोत्सवी सोहळा झाला. या कार्यक्रमाला देशभरातल्या दिग्गज नेत्यांनी उप स्थिती लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर आले. शरद पवारांशी कितीही मतभेद असले तरी त्यांच्याबद्दलचा आदर कायम आहे, असं सोनिया गांधीही या कार्यक्रमात म्हणाल्या.

यावेळी ‘ऑन माय टर्म्स’ आणि ‘लोक माझ्या संगती’ या शरद पवारांच्या जीवनावर आधारित असलेल्या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. तसंच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पवारांचा गौरव करण्यात आला.

याच कार्यक्रमात केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांच्या कार्याचं कौतुक केलं. मोदी म्हणाले, राजकारण आणि सहकार या दोन्ही क्षेत्रात पवार रमले, अशा व्यक्ती विरळ्याच असतात असं मोदी म्हणाले. बारामती हे पवारांचे विकासाचे मॉडेल असून शेतकरी हा त्यांच्या नेहमीच चिंतनाचा विषय असल्याचंही त्यांनी सांगितलं. कृषिमंत्री म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवणार्‍या शरद पवार यांनी शेतकर्‍यांमधील एका गुणाचा राजकारणात चांगला उपयोग केला आहे. शेतकर्‍यांना ज्याप्रमाणे हवामानाचा अंदाज असतो. त्याचप्रमाणे शरद पवार यांनाही राजकीय हवामानाची चांगली माहिती असते. देशाचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे समजून घ्यायचे असेल, तर काही वेळ शरद पवारांसोबत बसले पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दोन दशकांपेक्षा अधिक काळ पवारांची आणि आपली ओळख असून सर्वपक्षीयांशी त्यांची असलेली मैत्री हा त्यांचा विशेष गुण असल्याचं म्हटलं आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सामाजिक क्षेत्रात आणि देशाच्या आर्थिक विकासात पवारांचं मोलाचं मार्गदर्शन असल्याचं नमूद केलं. तसंच आर्थिक उदारीकरणाची धोरणं राबवताना पवारांच्या या मार्गदर्शनाचा उपयोग झाल्याचं ते म्हणाले. सत्काराला उत्तर देताना पवार यांनी आपण शेतकर्‍यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. संसदेचे काम चालणे महत्वाचे असून निवडून आल्यावर लोकांच्या समस्यांची चर्चा करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close