केडीएमटीच्या तिकीटांत घोळ, प्रवाशांना दिली 2011ची तिकीटं !

December 11, 2015 9:37 AM0 commentsViews:

kdmt ticket11 डिसेंबर : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन सेवा म्हणजेच केडीएमटीमधून प्रवास करताना एका प्रवाशाला चक्क 2011 चं तिकीट दिल्याची बाब समोर आलीये. मंगळवारी केडीएमटीमधून प्रवास करत असताना एका प्रवाशाला चक्क 29 जानेवारी 2011चं तिकीट देण्यात आलं. दुसरी गोष्ट म्हणजे याआधीही काही प्रवाशांना तिकीट रक्कमेपेक्षा कमी रकमेची तिकीटं मिळाली आहेत. यामुळे इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र पुरवणार्‍या ट्रायमॅक्स कंपनीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

मंगळवारी केडीएमटीच्या बसेसमधून खडेगोळवली मार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशाला वाहकाकडून 29 जानेवारी 2011 चे तिकीट देण्यात आले होते. प्रवाशाच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी वाहकाला विचारणा केली. मात्र वाहकाकडून त्याला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याने, दोघांमध्ये वाद झाला. हा प्रकार त्यांनी परिवहनचे सदस्य सुरेंद्र आढाव यांना सांगितला. त्यांनी परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून, केडीएमटीच्या ई-तिकिटिंग मशीनच्या अचूकतेबाबत संशय व्यक्त केला आहे. यापूर्वीही ई-तिकिटिंग मशीनमध्ये खडकपाडा ते कल्याण रेल्वे स्टेशन या अंतराचे तिकीट 8 रुपये असतानाही 6 रुपयांचे तिकीट वितरीत झालेले आहेत. त्यामुळे हा नवा तिकीट घोटाळा होत असल्याचा आरोप आढाव यांनी केला आहे.

याप्रकरणी सखोल चौकशी करून ट्रायमॅक्स कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच एस.टी. महामंडळाने ज्या कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे, त्याच कंपनीला केडीएमटीने ठेका दिला असल्याचे परिवहन सदस्य दत्तात्रय खंडागळे यांनी सांगितले. त्यामुळे केडीएमटीबरोबरच ट्रायमॅक्स कंपनीचा ठेकाही वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close